लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पाण्याच्या डबक्यात पडून मुलगा दगावल्यानंतर बायजीपुºयात एमआयएम नगरसेवक आणि राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवाराचे कार्यकर्ते काल सोमवारी समोरासमोर भिडले. या हाणामारीत एमआयएम नगरसेवक जफर बिल्डरसह तीन जण गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे. जिन्सी पोलिसांनी दोन्ही गटांविरुद्ध प्राणघातक हल्ला आणि दंगलीचे गुन्हे दाखल करून मंगळवारी चौघांना अटक केली. चौघांना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने तिघांना तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.बायजीपुरा भागात दोन दिवसांपूर्वी एका १५ वर्षीय मुलाचा मृत्यू पाण्याच्या डबक्यात पडून झाला होता. या कारणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता सलीम पटेल बोरगावकर याने फेसबुकवर बदनामी सुरू केल्याच्या संशयाचे पर्यवसान हाणामारीत झाले. एमआयएमचा नगरसेवक जफर बिल्डर याचा भाऊ अफसर हा गल्लीत उभा असताना सलीम पटेल समर्थकांनी अफसरवर हल्ला केला. त्या मारहाणीत त्याचे डोके फुटले. अन्य एकजण गंभीर जखमी झाला. हे कळताच नगरसेवक जफर बिल्डर व त्याच्या भावांनीही समर्थकांसह धाव घेतली. जफर बिल्डर व त्याच्या समर्थकांनीही सलीम पटेल यास घरासमोर अडवून लाठ्या-काठ्यांनी हल्ला केला. यात सलीम पटेलसह मोबीन हा गंभीर जखमी झाला. या प्रकरणी जिन्सी पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारींवरून नगरसेवक जफर बिल्डरसह त्याचा भाऊ अथहर, बाबर, अफसर, सलीम पटेल यांच्यासह १५ जणांविरुद्ध प्राणघातक हल्ला करणे दंगल घडवणे, मारहाण करून जखमी करणे अशा कलमांन्वये गुन्हा दाखल केला.
औरंगाबादेत एमआयएम, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 00:59 IST