औरंगाबाद : दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर (डीएमआयसी), स्मार्ट सिटीमुळे दिग्गज ‘आयटी’ कंपन्या औरंगाबादकडे आकर्षित होत आहेत. आॅटोमोबाईल उद्योगाच्या बाबतीत ‘मिनी डेट्रॉईड’ समजल्या जाणारे हे शहर भविष्यात ‘आयटी हब’ बनू शकते, असा विश्वास नॅसकॉमचे विभागीय प्रमुख प्रसाद देवरे यांनी शनिवारी व्यक्त केला. नॅसकॉमच्या वतीने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘आयटी उद्योगांतील संधी’ या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले. यानिमित्त औरंगाबादेत आलेल्या देवरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नॅसकॉमच्या स्नेहा सहस्त्रबुद्धे, सावन चुडीवाल, पीयूष कासलीवाल आदी उपस्थित होते. देवरे म्हणाले की, आयटी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयात दिले जाणारे शिक्षण आणि नोकरी मिळविण्यासाठी आवश्यक असणारे कौशल्य यांच्यात मोठी तफावत जाणवते. ही तफावत दूर करण्यासाठी नॅसकॉमतर्फे आयटी क्षेत्रातील विद्यार्थी आणि प्राध्यापकांना प्रशिक्षण दिले जात आहे. जगभरात झपाट्याने वाढणारा उद्योग म्हणून ‘आयटी’ क्षेत्राकडे बघितले जाते. या क्षेत्रात भौगोलिक बंधने नसल्याने ‘लोकल टू ग्लोबल’ व्यवसाय करणे सहज शक्य आहे. औरंगाबादेत लहान मोठ्या ५० ‘आयटी’ कंपन्या आहेत. जगाच्या कानाकोपऱ्यात त्या सेवा पुरवितात. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर आणि स्मार्ट सिटीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादेतील युवकांना ‘आयटी’ क्षेत्र काबीज करण्याची संधी आहे. स्टार्टअप केंद्रासाठी चाचपणी स्टार्टअप ‘आयटी’ उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी नॅसकॉमतर्फे देशभरात सात, तर राज्यात दोन स्टार्टअप केंद्रे उभारण्यात आली आहेत. ‘आयटी’ उत्पादने तयार करण्यासाठी लागणारे मार्गदर्शन, निधी आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी या केंद्रांतर्फे सहकार्य केले जाते. औरंगाबादच्या आयटी उद्योजक, विद्यार्थी, प्राध्यापक आणि महाविद्यालयांनी पुढाकार घेतल्यास येथेही स्टार्टअप केंद्र उभारता येऊ शकते. त्यामुळे औरंगाबादच्या युवकांना रोजगारासाठी पुणे आणि मुंबईसारख्या शहरात जाण्याची आवश्यकता भासणार नाही, असेही देवरे यांनी सांगितले.
औरंगाबाद बनू शकते ‘आयटी’ हब
By admin | Updated: July 3, 2016 00:50 IST