औरंगाबाद : महाड येथील घटनेनंतर शहरातील जीर्ण पुलांचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. मकाई गेट, पाणचक्की, बारापुल्ला गेट येथील पुलांसह शहरातील सर्वच लहान-मोठ्या पुलांचे आॅडिट करण्यात येणार आहे. औरंगाबादेतील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात आॅडिटची व्यवस्था नसल्यास पुण्याच्या कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगची (सीओईपी) मदत घेण्यात येणार असल्याचे मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी सांगितले. मंगळवारी दुपारी महापौरांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत आयुक्त पुढे म्हणाले की, शहरात तीन मोठे पूल आहेत. त्यांची सध्याची क्षमता काय आहे, हे तपासण्यात येईल. जड वाहनांसाठी हे पूल धोकादायक तर नाहीत, या दृष्टीने आपण नंतर निर्णय घेणारच आहोत. मागील दोन महिन्यांपासून महापौरांच्या आढावा बैठकीत खड्ड्यांचा विषय चर्चेला येतो. महापौर तुपे यांनी सांगितले की, प्रत्येक बैठकीत आम्ही प्रशासनाला हे विचारणे योग्य नाही. अखेर खड्डे बुजवायचे आहेत किंवा नाहीत हे सांगा. कार्यकारी अभियंता सिकंदर अली यांनी मेटल आणि मुरूम टाकण्याचे अंदाजपत्र तयार करण्यात आल्याचे नमूद केले. तीन ते चार दिवसांत कामही सुरू होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. क्रांतीचौक उड्डाणपुलावर खूप खड्डे झाल्याचा मुद्दा नगरसेवक राजू वैद्य यांनी उपस्थित केला. मनपा अधिकाऱ्यांनी उड्डाणपूल आपल्याकडे हस्तांतरित झालाच नाही, म्हणून हात वर केले. रस्ते विकास महामंडळाने कंत्राटदाराकडून करून घ्यायला हवेत. यासंदर्भात महामंडळाला पत्र देण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. पुंडलिकनगर येथील रस्त्याचे काम बऱ्याच दिवसांपासून बंद आहे. वाहतूक पोलिसांनी यासंदर्भात ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे, लवकरच काम सुरू होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.बैठकीला उपमहापौर प्रमोद राठोड, विरोधी पक्षनेते अयूब जागीरदार,राजू वैद्य, बापू घडामोडे, भाऊसाहेब जगताप, अतिरिक्त आयुक्त रमेश पवार, उपायुक्त रवींद्र निकम, अयूब खान, कार्यकारी अभियंता सिकंदर अली, अफसर सिद्धीकी, दीपाराणी देवतराज, संजय पवार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
शहरातील पुलांचे आॅडिट
By admin | Updated: August 10, 2016 00:28 IST