---
औरंगाबाद : घाटी रुग्णालयाला पीएम फंडातून प्राप्त व्हेंटिलेटर नादुरुस्त असल्याचा प्रकार समोर आला होता. याला लोकमतने वाचा फोडल्यावर यंत्रणा खडबडून जागी झाली. गेल्या तीन दिवसांपासून व्हेंटिलेटर दुरुस्तीचा खटाटोप करण्यात येत आहे. मात्र, त्यासाठी लागणाऱ्या सुटे भागाची जुळवाजुळव करण्याची वेळ कंपनीवर ओढावली आहे.
दुरुस्तीसाठी संबंधित कंपनीकडून आटोकाट प्रयत्न सुरू झाला आहे. यासाठी शुक्रवारी कंपनीचे आणखी वरिष्ठ अभियंते दाखल झाले असून ते व्हेंटिलेटर दुरुस्तीच्या कामात लागले होते. सायंकाळपर्यंत त्यांना यश आले नव्हते. साॅफ्टवेअरचाही दोष समोर आल्याने दिवसभर अभियंते साॅफ्टवेअरच्या दुरुस्तीत गुंतलेले होते. घाटी रुग्णालयात गंभीर रुग्णांची संख्या अद्यापही अधिक असून व्हेंटिलेटरची आवश्यकता भासत आहे. डाॅक्टरांनी हे व्हेंटिलेटर वापरायोग्य नसल्याचा अहवाल यापूर्वीच दिला आहे. तरीही दुरुस्ती करून हे व्हेंटिलेटर घाटीत ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे तज्ज्ञांचा अहवाल चुकीचा ठरवण्याच प्रयत्न गेला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
---
कंपनी राजकीय दबावाच्या चिंतेत
--
अधिष्ठाता डाॅ. कानन येळीकर म्हणाल्या, कंपनीचे प्रमुख राजेश कुमार सायंकाळी पोहचले. त्यांचे अगोदर आलेले अभियंतेही इथल्या दबावाच्या प्रकाराने घामाघूम झाले. आम्ही त्यांना शांत केले. त्यांना लागेल तो वेळ घ्या सांगितले. राजकीय दबाव सुरूच असतो. पण व्हेंटिलेटर दुरुस्तीचे बघा. इथे दुरुस्त होत नसतील तर व्हेंटिलेटर घेऊन जाऊन दुरुस्त करून घेऊन या. किंवा इथे दुरुस्त करा, अशी चर्चा झाली आहे. संध्याकाळपर्यंत व्हेंटिलेटर दुरुस्त झालेले नव्हते.
--