औरंगाबाद : सिडको ठाण्यात सोमवारी रात्री ७.३० वाजेच्या सुमारास शांतता समितीची बैठक सुरू असताना तेथे गांजाच्या नशेत धुंद एका हिस्ट्रीसिटर गुन्हेगाराने गोंधळ घातला. पोलिसांनी त्याला पकडून बाजूला नेले असता त्याने ठाण्याची खिडकी फोडून काचाने हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे सुरू असलेल्या बैठकीची शांतता काही वेळ भंग पावली. या प्रकरणी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे.प्रवीण ऊर्फ पऱ्या सोपान सावळे (२८, रा. आंबेडकरनगर), असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. तो अट्टल गुन्हेगार असून काही दिवस तो ‘एमपीडीए’खाली हर्सूल तुरुंगात होता. तसेच त्याला तडीपारही करण्यात आलेले होते. काल भावासोबत त्याचे भांडण झाले. गांजाच्या नशेत धुंद होऊन तो भावाविरुद्ध तक्रार देण्यासाठी सिडको ठाण्यात गेला. त्यावेळी तेथे शांतता समितीची बैठक सुरूहोती.ठाण्यात गेल्यावर तो जोरजोरात ओरडून गोंधळ घालू लागला. पोलिसांनी त्याला बाजूला नेऊन समजावून सांगण्याचा प्रयत्न केला; पण तो पोलिसांचेही ऐकेना. त्याने ठाण्याची खिडकी फोडून काचेने स्वत:च्या हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्नकेला. पऱ्याचा हा अवतार पाहून बैठकीसाठी आलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांबरोबर पोलीसही अवाक् झाले. पोलिसांनी त्याला पकडून निरीक्षक राजकुमार डोंगरे यांच्या कक्षात नेले. तेथेही पोलिसांना ढकलून तो बाहेर जाण्याचा प्रयत्न करीत होता. पोलिसांच्या हातून निसटल्यानंतर त्याने खिडकीची काच फोडली अन् हाताची नस कापली. पोलिसांनी त्याच्या हातातून काच हिसकावली.जवळपास १० मिनिटे ही झटापट सुरू होती. त्याला शांत करण्यास अखेर पोलिसांना यश आले. जमादार समाधान काळे यांच्या फिर्यादीनुसार प्रवीण ऊर्फ पऱ्या सावळेविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण करणे तसेच आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणे, असे दोन गुन्हे दाखल केले असून त्याला अटक करण्यात आली. पुढील तपास जमादार कोतकर करीत आहेत.
शांतता समितीच्या बैठकीत आत्महत्येचा प्रयत्न
By admin | Updated: June 11, 2014 00:53 IST