औरंगाबाद : सिटी वॉटर युटिलिटी कंपनीवर शनिवारी अज्ञात गुंडांनी केलेला हल्ला हा पाणीपट्टी वसुलीचे कंत्राट न मिळाल्यामुळे करण्यात आल्याची चर्चा आहे. पाणीपुरवठा होत नसल्याच्या कारणावरून तो हल्ला झाला नसण्यामागे एकमेव कारण म्हणजे, हल्ला करणारे व्यवसायप्रमुख गौरीशंकर बासू यांचे नाव घेऊन शिवीगाळ करीत होते. आमच्याशी वैर महागात पडेल, अशी धमकी देत त्यांनी कंपनीचे कार्यालय फोडले. कंपनीने पोलिसांकडे तक्रार केली आहे. हल्लेखोर कोण, याचा शोध पोलीस घेत आहेत.पाण्यासाठी नागरिक जलकुंभावर आंदोलने करीत आहेत. हल्लेखोर पाण्यासाठी हल्ला करण्यासाठी आले असते तर त्यांनी जलकुंभ गाठला असता. परंतु त्यांनी बासू यांचे नाव घेत कार्यालयात प्रवेश करून तोडफोड केली. कंपनीने याप्रकरणी कुणावरही संशय व्यक्त केलेला नाही. पाणीपट्टी वसुलीचे कंपनीने खाजगीकरण केले आहे. अनधिकृत नळ कनेक्शन शोधणे आणि ते नियमित करण्याचे काम दोन एजन्सींना देण्यात आले आहे. हे काम घेण्यासाठी काही राजकीय वरदहस्त प्राप्त मंडळी इच्छुक आहे. परंतु ते काम शिवसेना-भाजपाच्या गोटातील मर्जीतील लोकांना देण्यात आले आहे. तसेच कंपनीच्या आस्थापनेवर शिवसेना नेत्यांच्या जवळचे कर्मचारी कामाला आहेत. त्यामुळे काही वाद जरी झाले तरी ते विकोपाला जाणार नाहीत, असे कंपनीला वाटते. भाजपाचे काही पदाधिकारी कंपनीने नेमलेल्या कर्मचारी व सक्तीच्या पाणीपट्टी बिलांच्या पावत्यांबाबत आक्रमक आहेत. परंतु आता वसुली यंत्रणेत युतीच्या जवळची मंडळी असल्यामुळे समांतरवरून राजकीय बोंब केली जात आहे.
कंत्राट न दिल्याने हल्ला
By admin | Updated: December 29, 2014 01:07 IST