छत्रपती संभाजीनगर : एक वर्षासाठी हद्दपार झालेल्या हिस्ट्रीशिटर गुंडाने महापालिकेने संपादित केलेल्या भूखंडाचा मोबदला मिळवून देण्याचा बहाणा करीत सहा ते सात कोटी रुपयांची मालमत्ता बनावट कागदपत्रांच्या आधारे स्वत:च्या नावावर करून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा नोंदविला आहे.
फेरोज अहमद खान (रा. जिन्सी) असे आरोपीचे नाव आहे. जिन्सी ठाण्यात सामाजिक कार्यकर्त्या मेहरुन्नीसा बेगम हमीद खान यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या कुटुंबाची वडिलोपार्जित वारसा हक्काची जमिन सिटी सर्वे क्र. ११३१२/१ येथे जमिनी आहे. त्यातील ६ हजार चौरस फुट एवढी जमिन दमडी महल पुलाजवळ आहे. ज्याची किंमत सहा ते सात कोटी रुपये आहे. या प्रापर्टीमध्ये गफ्फार खान यासीन खान, मुजीब खान यासीन खान, हफिज खान यासीन खान आणि मृत हमीद खान यांची वारसदार मेहरुन्नीसा बेगम हमीद खान (सर्वजण रा. राहत कॉलनी) यांची मालकी आहे. सर्वांच्या मालकीच्या ताब्यातील ८ हजार चौरस फुट जागा रस्ता रुंदीकरणात महापालिकेने संपादीत केली.
या भूसंपादनातुन दमडी महल येथे १०० फुटांची रस्ता व पुलाचे काम केले. या भूसंपदानाचा मोबदला महापालिकेकडून अद्यापपर्यंत संबंधितांना मिळालेला नाही. हा मोबदला महापालिकेकडून मिळवून देण्यासाठी आणि उर्वरित जमिनी विक्रीसाठी तोतया एजंट फेरोज अहमद खान याने सर्वांना विश्वासात घेऊन मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी कार्यालयीन कामकाजासाठी काही दस्ताऐवज तयार केले. त्यासाठी फेरोज अहमद खान यास कमिशन देण्याचेही ठरले होते. मात्र, त्याने पुर्वनियोजित कट करून संपूर्ण मालमत्ताच बनावट कागदपत्रांच्या आधारे स्वत:च्या नावावर करून घेतल्याचे उघडकीस आले. त्यास कोणत्याही प्रकारे खरेदीखत करून दिलेले नाही. त्यानेच बनावट कागदपत्रे तयार करून संपूर्ण मालमत्ताच स्वत:च्या नावावर करून घेतल्याचे फिर्यादी म्हटले आहे. या प्रकरणी अधिक तपास उपनिरीक्षक रोहित गांगुर्डे करीत आहेत.
गोळ्या झाडुन हत्या करण्याची धमकी
आरोपीने बनावट कागदपत्रांच्या आधारे संपत्ती स्वत:च्या नावावर करून घेतल्यानंतर मुळ मालकांना बंदुकीच्या गोळ्या झाडुन एकेकाची हत्या करून टाकीन, मी तडीपार भाेगुन आलेला कुख्यात, हिस्ट्रीशिटर गुंड असल्याची धमकी आरोपीने दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.