छत्रपती संभाजीनगर : राज्य शासनाने शाळांमधील संचमान्यता करण्यासाठी सुधारित शासन निर्णय १५ मार्च २०२४ रोजी निर्गमित केला हाेता. त्यानुसार ३१ सप्टेंबरच्या पटसंख्येवरून संचमान्यता करण्यात येत आहे. त्याचा परिणाम म्हणजे, एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील ५१५ शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. त्यातच शिक्षकांच्या बदली प्रक्रियेमध्ये अनेक शिक्षकांनी बनावट कागदपत्रांचा आधार घेतला आहे. शिक्षकांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत असून, ५५ शिक्षकांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावल्याची माहिती शालेय शिक्षण विभागातून देण्यात आली.
राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने मागील वर्षी १५ मार्च २०२४ रोजी शासन निर्णयाद्वारे शाळांमधील संचमान्यतेचे निकष निश्चित केले आहेत. त्यानुसार मागील वर्षी ३१ सप्टेंबर रोजीच्या पटसंख्येच्या आधारावर संचमान्यता देण्यात आल्या आहेत. त्यानुसार यावर्षी जिल्हा परिषदेच्या शाळांमधील ५१५ शिक्षक अतिरिक्त ठरणार असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. पूर्वीच्या संचमान्यतेनुसार २० पटसंख्येच्या शाळेत एकच शिक्षक आणि दुसरा सेवानिवृत्त शिक्षक नेमण्याच्या सूचना आहेत. तसेच पूर्वी पहिली ते पाचवीच्या वर्गात ६१ विद्यार्थी असतील तर ३ शिक्षकांची तरतूद होती. मात्र, नव्या नियमात हा आकडा ७६ वर नेला आहे. त्याचवेळी चौथा शिक्षक पूर्वी ९१ पटसंख्येला देण्यात येत हाेता. आता तो १०६ वर पोहोचला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक शाळांमधील शिक्षक अतिरिक्त ठरणार असल्याचा दावा करीत राज्यभरात या शासन निर्णयाला विरोध करण्यात येत आहे. त्याविरोधात उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आलेल्या आहेत. तरीही शासनाने ठरविलेले धोरण कायम ठेवले आहे. त्याचा प्रत्यक्षात फटका बसण्यास सुरुवात झाली आहे.
बदल्यांचा गुंता वाढणारजि. प.च्या शालेय शिक्षण विभागाने शासनाच्या धोरणानुसार जि. प. शाळांमधील संवर्ग १ व २ मधील शिक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. मात्र, संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन न करताच या शिक्षकांच्या बदल्या करण्यात येत आहेत. त्यामुळे बदली झालेल्या ठिकाणचे शिक्षक अतिरिक्त होणार आहेत. त्यामुळे या बदल्यांचा गुंता अधिकच वाढणार असल्याचेही यातून स्पष्ट होत आहे.
बदल्यासांठी बनावट कागदपत्रांचा आधारजि. प.च्या शाळेतील शिक्षकांच्या बदल्यांमध्ये अनेक शिक्षकांनी बनावट कागदपत्रांचा आधार घेतला आहे. संवर्ग १ व २ मध्ये ज्या शिक्षकांनी कागदपत्रे सादर केली आहेत. त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. त्यात ५५ शिक्षकांचा भंडाफोड झाला असून, त्यांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागातर्फे देण्यात आली.
राज्यात २५ हजार शिक्षक अतिरिक्तराज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ५०० ते ७०० दरम्यान जि. प. शाळांमधील शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. त्यामुळे राज्यभरात एकूण २५ हजारांपेक्षा अधिक शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा धाेका निर्माण झाला आहे. १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयाचा विरोध अधिक प्रखरपणे करण्याची गरज निर्माण झाली आहे, अन्यथा गोरगरिबांच्या मुलांना शिकविण्यासाठी शिक्षकच उरणार नाहीत.- दिलीप ढाकणे, संस्थापक अध्यक्ष, आदर्श शिक्षक समिती.