औरंगाबाद : फळांचा राजा आंबा शहरातील बाजारात दाखल झाला असून, परराज्यातील विक्रेते रस्त्यांवर आंबा विकताना दिसत आहेत. सध्या आंब्याला मागणी वाढली असून, भावही ७०० रुपयांपर्यंत प्रति डझन विक्री केला जात आहे. झारखंड येथील विक्रेते वाशी बाजारपेठेतून आंबा आणून शहरात विकत असून, शहरात दररोज मोठ्या प्रमाणावर आंबा विकला जात आहे.
सध्या विविध जातींचे आंबे बाजारात विक्रीला आल्याचे दिसू लागले. शहरातील काही भागात आंबा विक्रीची दुकाने थाटली आहेत. झारखंड येथील विक्रेते वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतून हापूस आंबे आणून त्याची शहरात विक्री करत आहेत. एका विक्रेत्याने सांगितले की, झारखंडमधील ५ विक्रेत्यांनी येथे वेगवेगळ्या भागांत दुकाने सुरू केली आहेत. सध्या १२०० रुपये यास हापूस आंबा मिळत आहे. देवगडचा हा आंबा असून, दर दोन दिवसांनी शहरात ३० ते ४० पेटी आंबा विक्रीला येत आहे. एका पेटीत ४ ते ६ डझन आंबा असतो. आंबा महाग असल्याने सध्या दररोज ४० ते ५० डझन आंबा विकला जात आहे. पुढील महिन्यात आवक वाढून भावही सर्वसामान्यांच्या आवाक्यात येण्याची शक्यता आहे.
रत्नागिरीचा हापूस येणार एसटीने
गतवर्षी लॉकडाऊनच्या काळात एसटी महामंडळाच्या रत्नागिरी डेपोने हापूसच्या ३५०० पेटींची वाहतूक केली होती. यंदा एसटीने रत्नागिरी परिसरातील हापूस आंबा उत्पादक व होलसेलर यांच्याशी करार केले असून, एसटीने महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांत हापूस पोहोचविण्यात येणार आहे. मालवाहू एसटीने औरंगाबादमध्येही हापूस आंबा येणार आहे. यामुळे रत्नागिरीच्या हापूस आंब्याचा आस्वाद औरंगाबादकरांना घेता येईल.