पानकनेरगाव : बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांच्या पायदळ पालखीचे १५ जून रोजी सकाळी ८ वाजता मराठवाड्यात आगमन होणार आहे. पानकनेरगाव तसेच सेनगाव येथे पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात येणार असून भाविकांकडून त्याची तयारी करण्यात आली आहे.दरवर्षी शेगावीचा राणा श्री संत गजानन महाराज यांची पायदळ पालखी पंढरपूरला काढण्यात येते. तब्बल ४७ वर्षांची परंपरा या पालखी सोहळ्याला लाभली आहे. शेगाव ते पंढरपूर हे अंतर पायी चालून वारकरी पालखी सोहळ्यामध्ये विविध कार्यक्रम घेतात. यंदाच्या पालखीत एकूण ६५० वारकरी सहभागी असून त्यात पानकनेरगाव येथील ७२ वारकऱ्यांचा समावेश आहे. मागील १७ वर्षापासून या पालखी सोहळ्यासोबत हत्ती व अश्व ठेवण्यात येत आहेत. ही पालखी शेगावहून निघाल्यानंतर विदर्भातून मराठवाड्यात दाखल होते. त्यानंतर पुढे पंढरपुरकडे पालखीचे प्रस्थान होते. पालखी मार्गावर ठिक -ठिकाणी भाविकांकडून कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदा १५ जून रोजी सकाळी ८ वाजता संत गजानन महाराज यांची पालखी मराठवाड्यात दाखल होणार आहे. यानिमित्त पानकनेरगाव येथे ‘श्रीं’च्या पालखी स्वागताची जय्यत तयारी आली आहे. रविवारी सकाळी ९ वाजता गावामधून पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर गावातील शाळेमध्ये दर्शनासाठी पालखी ठेवण्यात येणार आहे. त्या ठिकाणी पालखीसोबत आलेल्या वारकरी- सेवेकऱ्यांची भोजन व्यवस्था ग्रामस्थांनी केली आहे. पानकनेरगाव येथून ही पालखी सेनगाव येथे मुक्कामासाठी प्रयान करणार आहे. सेनगाव येथे सायंकाळी ६ वाजता पालखीचे आगमन होणार आहे. भाविकांच्या भोजनाची व्यवस्था ग्रामस्थांतर्फे करण्यात आली आहे. जि.प. प्रशालेच्या प्रांगणात पालखी मुक्कामी राहणार असून त्या ठिकाणी भाविकांना दर्शन घेता येणार आहे. तसेच या निमित्त भजन-कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पालखी सोहळ्यानिमित्त आयोजित महाप्रसादाच्या कार्यक्रमाचा तसेच ‘श्रीं’च्या दर्शनाचा परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवहन ग्रामस्थांनी केले आहे. (वार्ताहर)असा राहणार पालखीचा मार्ग‘श्रीं’च्या पालखीचे श्रीक्षेत्र पंढरपूर पायदळ वारीसाठी भजनी दिंडी, गज व अश्वासह ५ जून रोजी सकाळी शेगावच्या श्री संत गजानन महाराज संस्थानमधून प्रस्थान झाले आहे. ही पालखी श्रीक्षेत्र नागझरी, पारस, गायगाव, भौरत, अकोला, भरतपूर, वाडेगाव, देवूळगाव (बाभूळगाव), पातूर, मेडशी, श्रीक्षेत्र डव्हा, मालेगाव, शिरपूर जैन, चिंचाबा पेन, म्हसलापेन, किनखेडा, रिसोड मार्गे रविवारी सकाळी मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात पानकनेरगाव येथे पोहोचणार आहे. रात्री सेनगाव येथे पालखी मुक्कामी राहणार असून १६ जून रोजी श्रीक्षेत्र नर्सी नामदेवहून डिग्रसला जाणार आहे. त्या ठिकाणी मुक्कामी राहून १७ जून रोजी सकाळी श्रीक्षेत्र औंढा नागनाथकडे पालखीचे प्रस्थान होणार आहे. तेथून जवळा बाजार येथे पोहोचल्यानंतर पालखीचा मुक्काम राहील. १८ जून रोजी आडगाव रंजेबुवा व हट्टा मार्गे परभणी जिल्ह्यातील श्रीक्षेत्र त्रिधारा येथे पालखी पोहोचणार आहे. त्याच ठिकाणी पालखीचा मुक्काम राहणार आहे. त्यानंतर ही पालखी पंढरपूरकडे प्रयाण करणार आहे.
गजानन महाराजांच्या पालखीचे आगमन
By admin | Updated: June 15, 2014 00:37 IST