हिंगोली : मुख्यमंत्री अभ्यासाच्या नावाखाली वेळकाढू भूमिका घेत असून शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी कोणत्याही समितीची गरज नाही. शेतकऱ्यांची अतिशय वाईट परिस्थिती आहे. त्यामुळे कर्जमाफी दिल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही, असे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी हिंगोलीत पत्रकार परिषदेत सांगितले.ते म्हणाले, आम्ही शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने हा दौरा करीत आहोत. या अभियानात पदाधिकारी नियुक्ती व जबाबदारी निश्चिती केली जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे १५ ते १७ जून या काळात कालावधीत शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेणार आहेत. मुख्यमंत्री कर्जमाफीला तयार आहेत तर मग मागचे तीन महिने काय केले? सुकाणू समिती हे चालढकलीचे प्रयत्न आहेत. त्याची गरजच काय, असा सवाल केला. मुख्यमंत्र्यांची निवडणुकीची तयारी असेल तर शिवसेनाही तयार आहे. त्यांना सत्ता भोगण्यासाठी शिवसेनेची मदत लागते अन् बारामतीत जावून राकॉंशी चुंबाचुंबी करतात. ७0 हजार कोटींचा सिंचन घोटाळा करणारे राकॉंवाले आम्हाला सत्तेतून बाहेर का पडत नाहीत, असे विचारत आहेत. हे म्हणजे सौ चूहे खा के बिल्ली चली हज को, असा प्रकार आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीची मंडळीच शेतकऱ्यांचे हाल होण्यास जबाबदार आहे. तर आता केंद्र व राज्यात दोन्हीकडे सत्ता असून भाजप कर्जमाफीवर निर्णय घेत नाही. बुलेट ट्रेनची काय गरज आहे. त्यावर खर्च करायला पैसा आहे. शेतकऱ्याला राजा म्हणायचे अन् तो दारिद्र्यात खितपत मरतोय तरीही पहायचे नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण योग्य नाही. तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा पाच महिने लावले तर आणखी ५00 शेतकऱ्यांचा बळी जाईल, अशी भीती व्यक्त केली.पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, शेतकऱ्यांचा जगण्याचा हक्क आहे. त्यांना त्यांच्या रास्त मागण्यांसाठी रस्त्यावर उतरण्याचाही अधिकार आहे. तो कर्जमुक्त व्हावा, स्वाभिमानी व्हावा, त्याच्या मालाला निदान उत्पादनखर्चापेक्षा जास्त भाव मिळावा, हीच त्याची भूमिका आहे. शासनलेखी १२५ रुपये मजुरीचा दर आहे. प्रत्यक्षात ५00 मोजावे लागतात. खते, बियाणांचे दरही वाढले. मग त्याच्या मालाचा भाव किती असावा, हे योग्य पद्धतीने ठरलेच पाहिजे. शेतकऱ्यांचे कोणतीही प्रश्न असो शिवसेना कायम त्यांच्या पाठीशी उभी राहिली. समृद्धी महामार्गाचा प्रश्न असो, कर्जमाफीचा असो की अन्य कुठलाही; भविष्यातही हीच भूमिका कायम राहील. यावेळी आ.जयप्रकाश मुंदडा, आ.हेमंत पाटील, आ. नागेश पाटील आष्टीकर, जिल्हाप्रमुख संतोष बांगर आदींची उपस्थिती होती.
‘कर्जमाफीशिवाय सेना स्वस्थ बसणार नाही’
By admin | Updated: June 10, 2017 23:37 IST