औरंगाबाद : भगवा दिवस साजरा करण्याचे निमित्त साधून भाजपा स्थानिक शाखेने आज औरंगपुऱ्यातील दक्षिणमुखी मारुती मंदिरात महाआरती केली. यावेळी भाजपाचे नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.६ डिसेंबर १९९३ ते २०१३ या २१ वर्षांच्या कार्यकाळात भाजपाने औरंगाबादेत कधीच भगवा दिवस साजरा केला नाही. आज प्रथमच भाजपाने वेगळी महाआरती केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. एकाच परिसरात दोन पक्षांच्या वेगवेगळ्या आरत्या एकाच वेळी आयोजित करण्यात आल्याने पोलिसांचा ताण बराच वाढला होता. दुपारी १२ वाजता भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी आरती केली. अवघ्या पंधरा मिनिटांमध्ये आरती संपली.यावेळी आ. अतुल सावे, माजी आ. किशनचंद तनवाणी, जिल्हाध्यक्ष बापू घडामोडे, माजी महापौर डॉ. भागवत कराड, नगरसेवक अनिल मकरिये, जगदीश सिद्ध, प्रीती तोतला, दयाराम बसय्ये, माजी उपमहापौर लता दलाल, बंटी रिडलॉन, चंदू तनवाणी, संकेत प्रधान आदींची उपस्थितीहोती.गुलमंडीची युती नाहीभाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, राज्यात सेना- भाजपाची युती झाली असली तरी गुलमंडीची युती झालेली नाही. त्यामुळे यंदा वेगळा कार्यक्रम घ्यावा लागला. गुलमंडीची आरती होणे तूर्त तरी शक्य नाही.दरवर्षी ६ डिसेंबर रोजी गुलमंडीवर भगवा दिवस साजरा करण्यात येतो. येथील सुपारी हनुमान मंदिरात शिवसेनेतर्फे महाआरती करण्यात येते. या आरतीला पूर्वी भाजपाचे नेते, कार्यकर्तेही उपस्थित राहत असत. मागील २१ वर्षांमध्ये प्रथमच शिवसेना- भाजपाने वेगवेगळ्या ठिकाणी महाआरती केली.शनिवारी सकाळी गुलमंडीवर सेनेच्या कार्यकर्त्यांनी अलोट गर्दी केली होती. दुपारी १२ वाजता खा. चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली. दुपारी एक वाजेपर्यंत एकूण ११ आरत्या करण्यात आल्या. यावेळी जिल्हाप्रमुख सुहास दाशरथे, महानगर प्रमुख प्रदीप जैस्वाल, अंबादास दानवे, नंदकुमार घोडेले, महापौर कला ओझा, सभापती विजय वाघचौरे, अनिल जैस्वाल, संतोष जेजूरकर, ऋषिकेश खैरे, पप्पू व्यास, रजनी जोशी, नारायण स्वामी, त्र्यंबक तुपे, दिग्विजय शेरखाने, नारायण जाधव, प्राजक्ता राजपूत, सोमनाथ बोंबले आदींची उपस्थिती होती.
सेना-भाजपाची ‘आरती’ वेगळी
By admin | Updated: December 7, 2014 00:18 IST