नांदेड : यंदा खरीप हंगामात ७ लाख ३८ हजार हेक्टरवर पेरणी झाली असून ज्वारीच्या क्षेत्रात २६२०० हेक्टरने घट झाली आहे. यामुळे पुढच्या हंगामात शेतकऱ्यांना जनावरांसाठी कडब्याची टंचाई भासण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात गतवर्षी ३१ जुलैपर्यंत ७ लाख ४१७०० हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली होती, तर यंदा ३१ आॅगस्टपर्यंत ७ लाख ३८ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. यावर्षी उशिरा झालेल्या पावासामुळे जिल्ह्यातील काही भागातील पेरण्या होऊ शकल्या नसल्याने अंदाजे ४० हजार एकर क्षेत्र पेरणीअभावी शिल्लक राहिले आहे. गतवर्षीची तुलना केली असता यंदा कापसाचे क्षेत्र २३०० हेक्टरने घटले तर सोयाबीनच्या क्षेत्रात ११०० हेक्टरने वाढ झाली आहे. गेल्या हंगामात ज्वारीची ८३७०० हेक्टरवर पेरणी झाली होती तर यंदा ५७३०० हेक्टरवर पेरणी झाली आहे. मुगाच्या हेक्टरी क्षेत्रात ८२०० ने तर उडदाच्या क्षेत्रात ९२०० हेक्टरने घट झाली आहे.गेल्या हंगामात मृग नक्षत्रालाच पाऊस झाल्याने पेरण्या वेळेवर होऊन या हंगामात पिकेही तोऱ्याने डोलू लागली होती. मात्र यंदा अधूनमधून बरसणाऱ्या पावसावरच बहुतांश शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, पावसाने दडी मारल्याने त्यांच्यावर दुबार-तिबार पेरणीचे संकट ओढवले. जिल्हयात ३१ आॅगस्टपर्यंत ९३ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून आजघडीला खरिपातील ७ टक्के क्षेत्र पेरणीअभावी शिल्लक आहे.जिल्ह्यात ७ लाख ५४ हजार हेक्टर क्षेत्र खरिपासाठी प्रस्तावित आहे. यापैकी ३१ आॅगस्टपर्यंत ७ लाख ३८ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. यातील जवळपास ५० टक्के शेतकऱ्यांनी दुबार-तिबार पेरणी केलेली आहे. गतवर्षी सप्टेंबर महिन्यात पिके मोठी होऊन डोलू लागली होती. मात्र यावर्षी शेतकऱ्यांना कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागल्याने दुबार-तिबार पेरणी करुनही पिके समाधानकारक नाहीत. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात ज्वारीचे क्षेत्र २६ हजार हेक्टरने घटले
By admin | Updated: September 11, 2014 00:24 IST