उस्मानाबाद : आदर्श आचारसंहिता कालावधीत पैशांबाबत आवश्यक ती कागदपत्रे नसताना दोन लाख रूपये बाळगणाऱ्याविरूध्द आचारसंहिता पथकाने रविवारी दुपारी हातलाई मंदिर परिसरात कारवाई केली़ हे पैसे शहर पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले आहेत़ मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक विभागाने आदर्शआचार संहितेचा भंग होवू नये, कायदा-सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी काटेकोर पावले उचलली आहेत़ याच अनुषंगाने संशयित वाहनांची ठिकठिकाणी तपासणी करण्यात येत आहे़ शहरानजीकच्या हतलाई डोंगर परिसरात आचारसंहिता पथकाचे सहाय्यक राजेंद्रकुमार शिंदे व सहकारी वाहनांची रविवारी दुपारी वाहनांची तपासणी करीत होते़ त्यावेळी आलेल्या एका कारमध्ये तपासणी केली असता आतमध्ये दोन लाख रूपये मिळून आले़ पैशांच्या व्यवहाराची आवश्यक ती कागदपत्रे न मिळाल्याने पथकाने पैसे शहर पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले आहेत़ दरम्यान, नातेपुते (ता़माळशिरस) येथील राजेंद्र शिंदे यांच्या कारमधील पैसे पकडण्यात आले असून, ते शेतात काम करणाऱ्या कामगारांना पैसे देण्यासाठी येत असल्याचे समजते़ त्यांनी सायंकाळी पैशाच्या व्यवहाराचे झेरॉक्स मागवून घेत निवडणूक विभागाकडे सादर केले होते़ मात्र, तरीही पैसे पोलिस ठाण्यात जमा करण्यात आल्याचे शिंदे यांचे म्हणणे आहे़ (प्रतिनिधी)आचार संहिता पथकाने रविवारी दुपारी कारवाई करून दोन लाख रूपये पोलिस ठाण्यात जमा केले आहेत़ निवडणूक विभाग व पोलिस प्रशासन पैशांची चौकशी करीत असून, समोर येणाऱ्या माहितीनुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आदिनाथ रायकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़आदर्श आचारसंहिता कालावधीत पैशांबाबतची आवश्यक ती कागदपत्रे नसल्याने तीन ठिकाणी कारवाई करून पाच लाख रूपये जप्त करण्यात आले आहेत़ उस्मानाबाद शहरानजीकच्या हातलादेवी डोंगराच्या पायथ्याशी गुरूवारी दुपारी एका जीपमधून आचार संहिता पथकाने एक लाख रूपये जप्त केले होते़ तसेच वाशी तालुक्यातील पार्डीफाट्यावर शनिवारी सायंकाळी आचारसंहिता पथकाने कारवाई करून दोन लाख रूपये तर रविवारी दुपारी उस्मानाबाद शहरानजीक हातलादेवी डोंगर परिसरात दोन लाख रूपये जप्त करण्यात आले आहेत़
आणखी दोन लाख जप्त
By admin | Updated: September 29, 2014 00:41 IST