औरंगाबाद : शिवसेनेचे वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांच्यासह कुटुंबाने भावजय आणि चुलत भावाला मारहाण केल्याचे प्रकरण गाजत असताना, त्यांचा भाऊ आणि पुतण्याचा आणखी प्रताप समोर आला आहे. बाेरनारे यांच्या शेताच्या बांधाला-बांध असलेल्या एक महिला आणि त्यांच्या शेतातील मजुराला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार ८ जानेवारी रोजी घडला होता. या प्रकरणात वीरगाव पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदविला. त्याच वेळी कडक कारवाई न झाल्यामुळे बाेरनारे कुटुंबाची हिंमत वाढल्यामुळे थेट भावजयीला मारहाण करण्यापर्यंत मजल गेल्याचे स्पष्ट होत आहे.
शिवसेनेचे वैजापूरचे आ.रमेश बाेरनारे यांचा भाऊ संपत नानासाहेब बाेरनारे व त्यांचा मुलगा अजिंक्य संपत बाेरनारे यांनी शेताच्या शेजारी असलेल्या नीता श्याम तांबे व शेतातील मजूर राहुल हरिभाऊ साळवे या दोघांना मारहाण करून शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणात नीता तांबे यांच्या फिर्यादीवरून संपत बाेरनारे आणि अजिंक्य बाेरनारे यांच्या विरोधात वीरगाव पोलीस ठाण्यात भादंवि ३२३, ५०४, ५०६ आणि ३४ कलमान्वये अदखलपात्र गुन्हा ९ जानेवारी रोजी नोंदविला. या घटनेला महिनाभराचा कालावधी उलटल्यानंतर केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.कराड यांचे स्वागत केल्यामुळे भावजय जयश्री दिलीप बोरनारे यांच्यासह चुलत भावाला आ.बोरनारे कुटुंबाने शुक्रवारी मारहाण केली. त्यामुळे महिनाभराच्या कालावधीत बोरनारे कुटुंबाने दुसऱ्यांदा महिलेला मारहाण केल्याचे स्पष्ट झाले. पहिल्या प्रकरणातच कडक कारवाई झाली असती, तर दुसरे प्रकरणच घडले नसते, अशी चर्चा वैजापूर तालुक्यात आहे. नीता तांबे यांना मारहाण केली, त्या प्रकरणात किरकोळ कलमे लावण्यात आल्याचा आरोप फिर्यादींच्या नातेवाइकांनी केला आहे.
ॲट्रॉसिटीचा गैरवापर केल्याबद्दल कारवाई कराआ.बोरनारे कुटुंबाने अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्याचा (ॲट्रॉसिटी) स्वत:च्या कौटुंबिक वादासाठी गैरवापर केला आहे. भावजयीला राजकीय द्वेषापोटी मारहाण केली. त्या प्रकरणात गुन्हा नोंदविल्यानंतर खासगी सचिवाला पुढे करून मारहाण झालेल्या फिर्यादीवरच ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंदविण्यास भाग पाडले. त्यामुळे जयश्री बोरनारे यांच्यावर दाखल ॲट्रॉसिटीचा गुन्हा रद्द करून, त्याचा दुरुपयोग केल्याच्या प्रकरणात कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे रिपाइंचे (आठवले गट) युवक संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष नागराज गायकवाड यांनी गृहमंत्री, पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली.