लातूर : विदर्भ व मराठवाड्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या दोन्ही विभागांत शासनाने तात्काळ दुष्काळ जाहीर करावा. विशेष बाब म्हणून लातूर जिल्ह्याला वाढीव अनुदान मंजूर करण्यात यावे, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली असून, या मागणीचा विचार न केल्यास काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून जनांदोलन करेल, अशी माहिती आमदार अमित देशमुख यांनी येथे रविवारी पत्रपरिषदेत दिली. आ. अमित देशमुख म्हणाले, गेल्या तीन-चार वर्षांपासून लातूर जिल्ह्यात पर्जन्यमान कमी झाले आहे. त्यामुळे चारा-पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पिकांची परिस्थिती बिकट आहे. राज्याच्या महसूल मंत्र्यांनी नुकताच मराठवाड्याचा दौरा करून परिस्थितीची पाहणी केली आहे. त्यामुळे त्यांनी तात्काळ दुष्काळ जाहीर करावा. त्यांच्या घोषणेची प्रतीक्षा आहे. दुष्काळ जाहीर केल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. लातूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा. पिण्याच्या पाण्यासाठी भरीव मदत करावी. चारा छावण्या सुरू कराव्यात. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात यावे. शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करण्यात यावे, शेतसारा माफ करण्यात यावा, विहीर-बोअर अधिग्रहण व टँकरने पाणीपुरवठा करण्याचे अधिकार तहसीलदारांना देण्यात यावेत. चारा खरेदीसाठी अनुदान देण्यात यावे. फळबाग पिकासाठी ७५ हजार रुपये अनुदान मंजूर करण्यात यावे. लातूर मनपाला टंचाई निवारणासाठी अतिरिक्त १० कोटी व जिल्हा परिषदेला ३० कोटी रुपये उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणीही आमदार अमित देशमुख यांनी पत्रपरिषदेत केली. या मागण्यांचा विचार न केल्यास काँग्रेस पक्ष येणाऱ्या काळात रस्त्यावर उतरून जनांदोलन करेल, असेही ते म्हणाले. पत्रपरिषदेला आ. त्रिंबक भिसे, अॅड. त्र्यंबकदास झंवर, अॅड. व्यंकट बेद्रे, महापौर अख्तर मिस्त्री, उपमहापौर कैलास कांबळे, मोईज शेख, प्रा. बी.व्ही. मोतीपवळे, अॅड. विक्रम हिप्परकर, दगडूसाहेब पडिले, राजकुमार जाधव आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)
-तर काँग्रेस रस्त्यावर उतरेल
By admin | Updated: November 24, 2014 00:36 IST