अंबड : विधानसभा निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने अंबड व घनसावंगी तालुक्यात मद्याचा महापूर आला आहे. तालुक्यात केवळ नऊ बियर बार, परमिट रुम व हॉटेल्स चालकांकडे मद्यविक्रीचा परवाना असताना खुलेआमपणे सर्रास दारु विक्री होत आहे.यंदाच्या विधानसभा निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. सर्वत्र केवळ विधानसभा निवडणुकांचीच चर्चा होताना दिसत आहे. कोण निवडून येणार, किती मतांच्या फरकाने कोणाचा जय, कोणचा पराजय होऊ शकतो, पंचरंगी निवडणुकीनंतर कोणाचे राजकीय भविष्य काय राहणार आदी प्रश्नांची चर्चा शहरातील चहाच्या टपरीपासून ते खेडयातील गाव चावडीपर्यंत सुरु आहे. तालुक्यातील कोणतीही चर्चा केवळ विधानसभा निवडणुकांच्या भोवतीच फिरताना दिसते. लहान-थोरांपासून सर्वसाधारण गृहिणींपर्यंत सर्वांनाच भावी आमदार,सरकार,मंत्री आदींविषयी प्रचंड औत्स्युक्य असल्याचे चित्र पाहावयास मिळते. सर्व प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने सर्व ताकदीनिशी निवडणुकांचा प्रचार सुरु आहे. यामध्ये साम, भेद व दाम या तिन्ही तंत्रांचा अमर्याद वापर सध्या सुरु आहे. तालुक्यातील जनतेने कधी ऐकलाही नसेल एवढया पैशाचा वापर सध्या ते प्रत्यक्ष अनुभवत आहेत, विशेष करुन घनसावंगी विधानसभा मतदारसंघात समावेश असलेल्या जिल्हा परिषद सर्कलमधील गावांमध्ये धनशक्तीच्या वापराची जाणीव खास करुन होत आहे.अवैध मद्यविक्री व मद्यप्राशनाचा प्रकार सर्रास सुरु असताना या सर्व प्रकाराकडे पोलीस प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष सुरुच आहे. शहागडपासून तीर्थपुरी पर्यंत तसेच शहागड पासून गोलापांगरी पर्यंत रोडच्या कडेला असलेल्या हॉटेल, ढाबे आदींवर सर्रास मद्यविक्री होताना दिसत आहे. निवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या गेल्याने उमेदवारांचे कार्यकर्ते मागेल त्याला, लागेल तिथे मद्याचा पुरवठा करत आहेत. मोफत व अत्यंत सुलभ पध्दतीने मद्य उपलब्ध होत असल्याने युवक मद्याच्या विळख्यात अडकण्याचा धोका निर्माण झाला आहे. सर्वत्र जेवणाच्या व्यवस्थेबरोबरच मद्याचीही व्यवस्था करण्यात येत आहे. (वार्ताहर)
अंबड-घनसावंगी तालुक्यात सर्रास विनापरवाना दारू विक्री
By admin | Updated: October 14, 2014 00:32 IST