लोकमत न्यूज नेटवर्कबीड : नगर पालिकेचे बांधकाम सभापती अमर नाईकवाडे यांनी पालिका कर्मचाऱ्याला शिविगाळ केल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर गुरूवारी नाईकवाडे यांनी नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांच्यावर निशाणा साधत आरोपांच्या फैरी पत्रकातून झाडल्या. कर्मचाऱ्यांना हाताशी धरून माझ्यावर तक्रार दिल्याचे त्यांनी म्हटले असून हा वाद चिघळण्याची दाट शक्यता आहे.नगर पालिका निवडणुकीपासून बीड शहरात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. क्षीरसागर विरूद्ध क्षीरसागर अशीच पालिका निवडणूक झाली होती. तेव्हापासून पालिकेत सर्वत्र राजकारण सुरू आहे. एकमेकांच्या विरोधात पत्रक काढण्याबरोबरच पालिकेचा भ्रष्टाचारावरून दोन्ही गट एकमेकांवर आरोंपाच्या फैरी झाडत आहेत. असाच प्रकार गुरूवारीही घडला. बांधकाम सभापती अमर नाईकवाडे यांच्यावर पालिका कर्मचारी बी.टी.जाधव यांनी शिविगाळ केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री अदखलपात्र गुन्हा दाखल झाला होता. यावर खुलासा करताना नाईकवाडे यांनी नगराध्यक्ष डॉ.क्षीरसागर यांनीच कर्मचाऱ्यांना पुढे करीत माझ्याविरोधात खोटी तक्रार दिल्याचा आरोप केला आहे. पालिकेत भ्रष्टाचार केल्याप्रकरणी २९ मे रोजी नगरविकास विभागाच्या आयुक्तांकडे तक्रार केली होती. याचाच मनात राग धरून जाधव यांना पुढे करीत तक्रार केली असल्याचे पत्रकात म्हटले आहे. एकुणच अमर नाईकवाडे यांनी काढलेल्या पत्रकामुळे पुन्हा एकदा नगर पालिकेतील अंतर्गत वाद आणि राजकारण चव्हाट्यावर आले आहे.
पालिका बांधकाम सभापतीचे नगराध्यक्षांविरोधात आरोप
By admin | Updated: June 1, 2017 00:30 IST