उस्मानाबाद : जिल्हा सहकारी बँकेची आर्थिक परिस्थिती, शेतकरी, सभासदांना वेळेवर न मिळणारे हक्काचे पैसे, बंद पडू लागलेल्या शाखा ही परिस्थिती पाहता बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी याबाबत ‘लोकमत’ने बुधवारी वृत्त प्रसिध्द केले होते़ या वृत्ताची सर्वपक्षीय नेतेमंडळी, पदाधिकाऱ्यांनी दखल घेत बिनविरोध निवडणुकीसाठी तयारी दर्शवत चर्चा सुरू केली आहे़ मात्र, यासाठी ठोस पुढाकार घ्यायचा कोणी ? असा प्रश्न समोर येत आहे़एकीकडे जिल्हा बँकेला शासनाकडून छदाम मदत मिळालेली नाही तर दुसरीकडे शेतकरी, ठेवीदारांना हजार रूपयेही वेळेत मिळत नाहीत़ अशा परिस्थितीत जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे़ जिल्हा बँकेचे जवळपास सहा लाखांच्या आसपास ठेवीदार सभासद असून, ठेवीदारांचे जवळपास ४०० कोटी बँकेत अडकले आहेत़ बँकेनेहीे जवळपास ८०० कोटी रूपयांचे कर्जवाटप केलेले आहे़ बँकेतील ठेवी आणि कर्जवाटप, शासनाकडून येणाऱ्या निधीची आकडेवारी यात मोठा फरक आहे़ तसेच कर्जवसुलीसाठी येणाऱ्या शासकीय, राजकीय निर्बंधामुळे अपेक्षित कर्जाची वसुली होत नाही़ परिणामी बँकेसमोरील आर्थिक अडचणी वाढत आहेत़ मागील पाच वर्षांत जिल्हयातील प्रमुख नेत्यांनी शासनदरबारी पाठपुरावा करुनही बँकेच्या परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. अशा स्थितीत आता होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये ‘ओसाड गावच्या पाटीलकीसाठी’ सर्वपक्षीयांनीच राजकीय ताकद पणाला लावली असून, १५ संचालकपदासाठी एक दोन नव्हे तब्बल २४७ नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत़ सर्वपक्षीयांची ‘सत्ते’साठी सुरू असलेली राजकीय हालचाली पाहता, निवडणूक विभागाच्या गणितापेक्षा अधिकचा खर्च बँकेला करावा लागणार आहे़ हा प्रकार टाळण्यासाठी सर्वपक्षीयांनी पुढाकार घेऊन संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध काढण्याची आवश्यकता आहे. यासाठी अधिवेशन काळात जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांमध्ये प्राथमिक चर्चाही झाली आहे. मात्र त्यानंतर चर्चेचे घोडे अडल्याचे दिसते. सर्वसामान्य शेतकऱ्यांसह सभासदांच्या हिताचा विचार करुन या राजकीय मंडळीनी बँक बिनविरोध काढण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा.(प्रतिनिधी)
बिनविरोधच्या मुद्यावर सर्वपक्षीय राजी !
By admin | Updated: April 19, 2015 00:47 IST