लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड:प्रकल्प भरल्यानंतर आतापर्यंत चार वेळेस विष्णूपुरी प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले असून आता जायकवाडीच्या वरच्या पट्ट्यात सुरु असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना पुन्हा सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे़यंदाच्या पावसाळ्यात मृग नक्षत्रानंतर २० आॅगस्टपासून नांदेड जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात झाली होती़ २१ आॅगस्टच्या पहाटे नांदेडात अतिवृष्टी झाली होती़ तर विष्णूपुरी प्रकल्पाचे लाभक्षेत्र असलेल्या परभणी जिल्ह्यातही पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे एकाच दिवसात विष्णूपुरीचा पाणी साठा ८ टक्क्यांहून ९० टक्क्यांवर गेला होता़ त्यामुळे धरणाचा एक दरवाजा उघडण्यात आला होता़ त्यानंतर सलग सुरु असलेल्या पावसामुळे आतापर्यंत विष्णूपुरी प्रकल्प चार वेळेस भरला आहे़त्यामुळे चार वेळेस प्रकल्पाचे दरवाजे उघडून गोदावरीत पाण्याचा विसर्ग करण्यात आला़ गोदावरीच्या पाणीपातळीत होणारी वाढ लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने गोदाकाठच्या गावांना यापूर्वी अनेकवेळा सतर्कतेचा इशारा दिला होता़ आता मात्र नाशिक व वरील भागात झालेल्या जोरदार पावसामुळे औरंगाबादचे जायकवाडी धरण पहिल्यांदा ७८ टक्के भरले आहे़ तर विष्णूपुरीत आजघडीला ९० टक्के पाणीसाठा आहे़ जायकवाडी धरणाच्या वरील भागात आणखी पाऊस झाल्यास जायकवाडीतील अतिरिक्त जलसाठा गोदावरीत सोडण्यात येणार आहे़त्यामुळे जायकवाडीतून पाणी सोडल्यास धरणाखालील गोदाकाठच्या गावांना पुराचा धोका होऊ शकतो़ त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे़ त्याबाबत स्थानिक प्रशासकीय पूर यंत्रणेलाही सूचना देण्यात आल्या आहेत़
गोदाकाठच्या नागरिकांना अलर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:11 IST