वैजापूर- नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे गोदावरी नदीपात्रात बुधवारी दुपारी सुमारे १ लाख ९३ हजार क्युसेक्सहून जास्त क्षमतेने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गोदामाई धोक्याच्या पातळीवरून दुधडी भरून वाहत असून, हे पाणी जायकवाडीच्या दिशेने वेगाने झेपावत आहे. धरणातून होत असलेल्या विसर्गामुळे वैजापूर तालुक्यातील गावांना संभाव्य धोका लक्षात घेऊन वैजापूरमधील ९ गावांतील मिळून २२५ कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे, तर अजूनही २५० पेक्षा अधिक नागरिक सराला बेटावर अडकले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.महसूल प्रशासनाने सोमवारीच वैजापूर तालुक्यातील गोदाकाठच्या १७ गावांना अति दक्षतेचा इशारा दिलेला असतानाही काही ठिकाणी या सूचनेकडे ग्रामस्थांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने बऱ्याच ठिकाणी नागरिक अडकल्याचे वृत्त समोर येत आहे. दरम्यान, वांजरगाव येथील सराला बेट, शिंदे वस्तीला पाण्याने वेढा घातल्याने मठाधिपती रामगिरी महाराज यांच्यासह २५० पेक्षा जास्त नागरिक अडकले आहेत. यामुळे प्रशासनाची चांगलीच झोप उडाली आहे. त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी सोमवारपासून उपजिल्हाधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार सुमन मोरे, मनोहर गव्हाड हे महाराजांची मनधरणी करीत आहेत. मात्र, महाराजांनी बेट न सोडून जाण्याचे सांगितल्याने प्रशासनाच्या अडचणी वाढल्या आहेत. गोदावरी नदीतील पाण्यामुळे कोणत्याही गावांना पुराचा वेढा पडलेला नाही. तथापि, नदी व ओढ्यातील पाण्यामुळे पुरणगाव ते बाभूळगाव, वांजरगाव ते भालगाव आणि लाखगंगा ते बाबतारा या रस्त्यावरील वाहतूक बंद आहे. काही गावांच्या शेतजमिनीत नदीपात्राबाहेर पडलेले पाणी शिरले असून, त्यामुळे शेतपिकाचे नुकसान झाले आहे.
वैजापुरात अजूनही ‘हायअलर्ट’
By admin | Updated: August 4, 2016 00:38 IST