नांदेड : यशवंतराव चव्हाण यांनी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर पहिले मुख्यमंत्री म्हणून अत्यंत प्रतिकूल राजकीय परिस्थितीत राज्याचे सूत्रे स्वीकारली. त्यावेळी राज्याच्या विविध विभागांमध्ये परस्परांबद्दल अविश्वास, संशय व तणावाचे वातावरण होते. त्यामुळे प्रादेशिक एकात्मता निर्माण करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर होते. या सर्व बिकट अवस्थेतून महाराष्ट्राला बाहेर काढण्याचे काम यशवंतरावांनी केले. परंतु त्यांच्यानंतर मात्र महाराष्ट्राचे राजकारण भरकटले असल्याचे प्रतिपादन राजकीय वेिषक प्रा.डॉ.प्रकाश पवार यांनी केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र, लातूर आणि पीपल्स कॉलेजच्या राज्यशास्त्र विभागाच्या वतीने शरद पवार यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित परिसंवादात प्रा. डॉ. पवार बोलत होते. ते म्हणाले, यशवंतरावानंतर काही मुख्यमंत्र्यांनी चांगले प्रयत्न केले. परंतु अनेक कारणांमुळे त्यांना यश आले नाही. त्यात वसंतराव नाईक, शरद पवार आणि शंकरराव चव्हाण यांचा समावेश आहे. यशवंतरावाच्या वेळी जातीय व सामाजिक विषमता मोठय़ा प्रमाणावर होती. त्यामुळे सामाजिक न्यायाची प्रस्थापना करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर होते. परंपरागत सामाजिक मूल्ये आणि सरंजामशाही मनोवृत्तीला आधुनिकतेत रुपांतरित करणे हाही त्यांच्यादृष्टीने महत्वाचा प्रश्न होता. त्यातून एकसंघ, विकसीत, संपन्न व आधुनिक महाराष्ट्र निर्माण करण्याचा निर्धार यशवंतरावांनी केला होता. त्याची अंमलबजावणीही नेटाने केली. माजी मंत्री कमलकिशोर कदम म्हणाले, शरद पवार यांनी अत्यंत काळजीपूर्वक परिस्थिती हाताळत सहमतीचे राजकारण केले. त्यामुळे अनेक पक्षांत त्यांचे मित्र आहेत. एक सहकारी या नात्याने पवार यांच्यासोबतच्या वैयक्तिक आठवणीही त्यांनी सांगितल्या. सूत्रसंचालन डॉ.अशोक सिद्धेवाड यांनी केले. प्रास्ताविक प्रा. उत्तमराव सूर्यवंशी तर हरिभाऊ जवळगे यांनी आभार मानले. /(प्रतिनिधी)
यशवंतरावानंतर राजकारण भरकटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2015 13:35 IST