आशपाक पठाण, लातूरमार्च एण्डमुळे मनपाने मालमत्ता कर वसुलीसाठी पथके नियुक्त केली असून, सक्तीने वसुली केली जात आहे. शुक्रवारी गुळ मार्केट येथे वसुलीसाठी गेलेल्या पथकाला पाहून २७३ दुकानांचे शटर दुपारी शटर डाऊन झाले. तर सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास एमआयडीसीत वसुलीसाठी आलेल्या पथकासोबत उद्योजकांचा शाब्दिक ‘वॉर’ झाला. दरम्यान, एमआयडीसी उद्योजकांनी शनिवारी उद्योग बंदची हाक दिली आहे.बाजार समितीच्या मालकीची असलेली गुळ मार्केट येथे जवळपास २७३ दुकाने आहेत. याशिवाय, महापालिकेच्या मालकीची विविध ठिकाणी दुकाने आहेत. मालमत्ता कर वसुलीसाठी मनपाने सक्ती सुरू केल्याने भाडेकरू व्यापारी महासंघानेही विरोध दर्शवीत गुरुवारी बंद पाळून निषेध केला. शुक्रवारी गुळ मार्केट येथे वसुलीसाठी गेलेल्या पथकाला पाहून काही क्षणातच सर्वच दुकानदारांनी शटर डाऊन केले. नेमकी वसुली करायची कोणाकडून, असा प्रश्न पथकाला पडला. सर्वच व्यापाऱ्यांनी मालमत्ता कर भरण्यास विरोध दर्शविला आहे. एमआयडीसीतील उद्योजक संघटनेने शनिवारी बंद पुकारला आहे. या बंदमध्ये एमआयडीसीतील सर्व उद्योजक सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष बसवणप्पा पाटणकर यांनी दिली. यावेळी उद्योजक सुनील लोहिया, प्रा. किशोर सगर, कमलाकर जाधव, कृष्णा तिगिले, दुष्यंत क्षीरसागर, अजय निलेगावकर यांच्यासह उद्योजक उपस्थित होते. उद्योजकांची मागणी मनपा मान्य करणार असेल, तर आम्ही लागलीच कराचा भरणा करू. शहर विकासासाठी आमचीही जबाबदारी आहे. परंतु, आमच्यावर अन्याय होत असेल, तर तो आम्ही सहन करणार नाही, असे उद्योजक चंदूलाल बलदवा ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले.मनपाने नियमाप्रमाणेच मालमत्ता कर लावलेला आहे. त्यामुळे व्यापारी असोत की उद्योजक यांनी विरोध करू नये. शहर विकासासाठी असलेला हा कर भरावाच लागेल. यातून कोणालाही सूट मिळणार नाही, असे सहाय्यक आयुक्त वसुधा फड म्हणाल्या.
मनपाच्या वसुली पथकाला पाहताच दुकानांचे शटर डाऊन
By admin | Updated: March 28, 2015 00:45 IST