लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : येथील गोविंद गगराणी या १९ वर्षीय युवकाचा तिघांनी खून केल्याचे सोमवारी उघडकीस आल्यानंतर अंबडसह जिल्ह्यात खळबळ उडाली. या प्रकरणात पोलिसांनी २४ तासांत दोघांना ताब्यात घेतले असले तरी गूढ उलगडले नाही. तिसरा संशयित आरोपी जोपर्यंत जेरबंद होत नाही, तोपर्यंत खुनाचे कारण कळू शकणार नसल्याचे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले.नाथसागर उर्फ तुक्या रामनाथ जाधव (१८ , रा. बाजारगल्ली, अंबड) आकाश उर्फ गोट्या अशोक घोडे (१९,रा. अंबड) व अरुण कानिफनाथ मोरे (२०, रा. अंबड) या तिघांनी गोविंदचा घात केल्याचे दुसºया दिवशी पोलीस तपासात स्पष्ट झाले.घटनेच्या दिवशी गोविंद मृत झाला नसल्याचे समजून त्यांनी त्याच्यावर पुन्हा लोखंडी सबलने वार केले. त्यानंतर गोविंदच्या खिशातून मोबाईल, पैसे, पाकीट काढून आकाश व अरुणने पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह खदानीत फेकून दिला. याच खदानीच्या पाण्यात तिघांनीही कपडे, चपला धूतल्यानंतर घर गाठले. त्यानंतर इतरत्र फरार झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.पोलिसांनी त्यांच्याकडून सबलसह रक्ताने माखलेले कपडे व इतर साहित्य हस्तगत केले. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या प्रकरणाचा तपास करुन पोलिसांनी २४ तासांतच दोघांना ताब्यात घेतले. मात्र, तिसरा संशयित आरोपी अद्याप दूरच असल्याने पोलिसही बुचकळ्यात पडले आहेत.खुनाबाबत विविध तर्कवितर्क लढविले जात आहेत. खंडणी वा पैशांसाठी गोविंदचा खून करण्यात आल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलीस काढत आहेत.असे असले तरी उपरोक्त तिघेही आरोपी हे सोशल मीडियातून सामाजिक वातावरण दुषित करण्याचा नेहमीच प्रयत्न करायचे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. तसेच तिघेही जुगारी व व्यसनी होते. त्यामुळे गोविंदच्या खुनाच्या उद्देशाबाबत पोलीस संभ्रमात आहेत. गोविंदचा खून नेमक्या कोणत्या कारणामुळे करण्यात आला, हे स्पष्ट होत नसल्याने विविध पातळ्यांवर पोलीस तपास करीत आहेत. सर्व शक्यता पडताळून पाहत तिसरा आरोपी जेरबंद करण्यासाठी पोलीस शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. यासाठी चार पथके रवाना विविध ठिकाणी रवाना झाले आहेत.अंबड शहरतील व्यापारी शिवप्रसाद गगराणी यांच्याकडे तुक्या जाधव हा दोन वर्षांपूर्वी भाड्याने राहात होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे हा खून पैशांच्या व्यवहारातून झाला की अन्य कारणातून याचा तपास पोलीस करीत आहेत.संशयित तुक्या जाधवला मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले असता, त्यास सात दिवसांची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. तर आकाश घोडे याला बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
आरोपींच्या अटकेनंतरही गगराणी खुनाचे गूढ कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 00:49 IST