औरंगाबाद : मागील चार वर्षांपासून रखडलेल्या विमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यांची जूनमध्ये निवड प्रक्रिया पूर्ण झाली. नवनियुक्त सदस्यांची बैठक घेण्याचे नियोजनही करण्यात आले. परंतु विमानतळावरील लाचखोरीच्या प्रकरणामुळे बैठकीचा मुहूर्त हुकला तो हुकलाच. तीन महिने उलटूनही समितीची बैठक झालेली नाही.विमानतळ प्रशासनाचे कामकाज अधिक पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुविधांच्या दृष्टीने सल्लागार समिती महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडते. चिकलठाणा विमानतळाच्या सल्लागार समितीची नेमणूक प्रक्रिया चार वर्षांपासून रखडली होती. त्यामुळे समितीच्या बैठकाच होऊ शकल्या नाहीत. सदस्यांच्या निवड प्रक्रियेसाठी विमानतळ प्राधिकरणाकडून पाठपुरावा केला जात होता. अखेर जूनमध्ये सहा सदस्यांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली. त्यासंदर्भात विमानतळ प्राधिकरणाला व सदस्यांना अधिकृत पत्रही प्राप्त झाले. नव्या सदस्यांची बैठक घेण्याचे नियोजन करण्यात आले. बैठकीचे नियोजन सुरू असतानाच विमानतळ संचालक लाच प्रकरणात सापडले. त्यामुळे बैठकीचे नियोजनच विस्कळीत झाले. तीन महिने उलटूनही बैठक होत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे या समितीचे अस्तित्व केवळ नाममात्र आहे. विमानतळावरील प्रश्नांच्या सोडवणुकीच्या दृष्टीने समितीची बैठक घेण्याची मागणी होत आहे.
सल्लागार समिती कागदावरच
By admin | Updated: October 15, 2016 01:21 IST