बीड : विना अनुदानित व स्वयं अर्थसहाय्यित शाळांमध्ये बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार नियम २००९ (आरटीई) नुसार २५ टक्के मोफत प्रवेशासाठी आॅनलाईन नोंदणी केलेल्या १५३४ विद्यार्थ्यांपैकी केवळ ८२९ जणांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना मोफत प्रवेशांपासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात १७२ इंग्रजी शाळा असून, त्यामध्ये १५३४ विद्यार्थ्यांनी २५ टक्के मोफत कोट्यातून प्रवेशासाठी शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर आॅनलाईन नोंदणी केली होती. ७६ शाळांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यामुळे शिक्षण विभागाने सोडत पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवली होती. मात्र, अद्यापपर्यंत सर्व विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांवर मोफत कोट्यातील प्रवेशापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.दरम्यान, शाळांच्या एकूण प्रवेश क्षमतेच्या २५ टक्के मोफत देणे बंधनकारक आहे. मात्र, २५ टक्के कोट्यात उपलब्ध क्षमतेपेक्षा कमी विद्यार्थ्यांना शाळांनी प्रवेश दिले आहेत. घरापासून शाळेचे अंतर, विद्यार्थ्याच्या वयाचा दाखला या प्रमाणपत्रासाठी अनेक शाळांनी पालकांना रिकाम्या हाताने परत पाठवले आहे. प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख २० मार्च आहे. त्यामुळे पालकांची धांदल उडत आहे. (प्रतिनिधी)
निम्म्याच विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया
By admin | Updated: March 18, 2017 23:16 IST