सेलू : येथील तहसील कार्यालयात नायब तहसीलदार पदाची चार पदे मंजूर असतानाही केवळ दोनच नायब तहसीलदार कार्यरत असल्यामुळे कामकाजास अडथळा निर्माण होत आहे़ दरम्यान, जात प्रमाणपत्र, पीक कर्जासाठी शेतकरी व विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे़ सेलू तहसील कार्यालयात पुरवठा, निवडणूक, महसूल व संजय गांधी निराधार योजनेसाठी स्वतंत्र नायब तहसीलदारांची पदे आहेत़ परंतु, श्रीकांत वांभुरकर व सी़ एस़ जोशी हे दोनच नायब तहसीलदार कार्यरत असल्यामुळे कामाचा निपटारा करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत़ नायब तहसीलदारांसह मंडळ अधिकाऱ्याचे एक पद व तलाठयाची तीन पदे रिक्त आहेत़ सध्या मराठा जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी तहसील कार्यालयात मोठया प्रमाणावर प्रस्ताव दाखल करण्यात येत आहेत़ तसेच शेतकरी पीक कर्जासाठी लागणारे प्रमाणपत्र, सात-बारा मिळविण्यासाठी गर्दी करत आहेत़ दोनच नायब तहसीलदार असल्यामुळे अनेक कामे विलंबाने होत आहेत़ त्यातच श्रीकांत वांभुरकर हे ३० जुलै रोजी सेवानिवृत्त झाल्यामुळे एकच नायब तहसीालदारावर कामाची जवाबदारी पडली आहे़ सुवर्ण जयंती, राजस्व अभियानात विविध प्रमाणपत्रे तसेच ग्रामीण भागातील कामे करणे अपेक्षित आहे़ परंतु, दोनच नायब तहसीलदार असल्यामुळे इतरांवर कामाचा दीर्घ ताण वाढला आहे़ तालुक्यात पाच महसूल मंडळे असून वालूरचे पद रिक्त आहे़ त्यामुळे इतर मंडळाच्या प्रमुखाकडे पदभार देण्यात आला आहे़ दरम्यान, तहसील कार्यालयात नायब तहसीलदारासह तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांची रिक्त पदे तत्काळ भरावीत, अशी मागणी होत आहे़ (प्रतिनिधी)विद्यार्थी व शेतकऱ्यांची हेळसांड पीक कर्ज व शैक्षणिक प्रवेशासाठी लागणारे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी तहसील कार्यालयात विद्यार्थ्यांसह शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. त्यातच मराठा समाजाचे जात प्रमाणपत्र काढण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयात तरुणांची गर्दी आहे. दस्तावेज करण्यासाठी विद्यार्थी सेतू कार्यालयामार्फत प्रस्ताव पाठवत आहेत. विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता जात प्रमाणपत्र प्रस्तावासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करणे गरजेचे आहे.नायब तहसीलदारांची चार पदे मंजूर आहेत. मात्र दोनच नायब तहसीलदार कार्यरत आहेत. त्यातच एक नायब तहसीलदार सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे एकाच नायब तहसीलदारावर कारभार होणे शक्य नाही. शासनाने या ठिकाणीची रिक्त पदे भरणे आवश्यक आहेत.
दोनच नायब तहसीलदारांवर कारभार
By admin | Updated: August 2, 2014 01:30 IST