सोनपेठ : तालुक्यातील २० कि.मी.च्या गोदाकाठावर ठिकठिकाणी वाळू तस्करांनी वाळू साठे निर्माण केले आहेत. परंतु प्रशासनाने या वाळू साठ्याविरुद्ध कसलीच कारवाई न केल्याने एक प्रकारे प्रशासनाची वाळू तस्करांना मूभा असल्याचे चित्र दिसत आहे. तालुक्यातील काही गावच्या वाळू धक्यांचा लिलाव करण्यात आला होता. परंतु तालुक्यातील अनेक वाळू धक्यावरून वाळू पळविण्याचा सपाटा तस्कारांनी केला आहे. येथील पोलिस ठाण्याला नव्यानेच रुजू झालेले सहाय्यक पोलिस निरीक्षक दादेवाड यांनी स्वत: कारवाई करीत वाळू पळविणाऱ्या तस्करांच्या वाहनासह जेसीबी जप्त करून गुन्हा दाखल केला होता. मध्यंतरी महसूल प्रशासनाने वाहनातून अतिरीक्त वाळू नेणाऱ्या वाहनांविरुद्ध कारवाईचे नाटक केले. तालुका प्रशासनाला स्वत:च्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही. परंतु दुसऱ्या डोळ्यातील उसळ दिसते, अशी अवस्था तालुक्यातील ठिकठिकाणच्या वाळू साठ्यावरून दिसून येत आहे. तालुक्यात वाळू तस्करांनी निर्माण केलेले वाळू साठे हे बघितल्यानंतर वाळू तस्करीचा आवाका किती मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे दिसून येते. वास्तविक वाळू साठा करण्याची मूभा कायद्यात नाही. परंतु वाळू साठा निर्माण करण्यासाठी दोन ते तीन महिने चालणारी वाहने तालुका प्रशासनाला दिसत नाहीत काय? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकात विचारला जात आहे. प्रशासनाच्या वतीने अवैद्य वाळू चोरी करणाऱ्यांवर थातूर-मातूर कारवाई केली जात आहे़ याकडे संबंधितांनी लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. (वार्ताहर)कुचकामी कारवाईवाळू साठ्यांचा लिलाव करून प्रशासनाच्या वतीने वाळू तस्करांना एक प्रकारे अधिकच परवाना दिला जात आहे. दरवर्षी वाळू साठ्याचा लिलाव करून जी रक्कम शासकीय दरबारी भरल्या जाते त्याच्या किती तरी पटीने वाळू तस्कर स्वत:च्या खिशात पैसे घालतात. वाळू साठ्याच्या कुचकामी कारवाईमुळे वाळू तस्करांचे धाडस वाढलेले आहे. संबंधित अधिकाऱ्यांचा वचक राहिला नाही़
वाळू तस्करांच्या वाळू साठ्यांना प्रशासनाची मूभा
By admin | Updated: July 25, 2014 00:27 IST