बीड : शिक्षकांच्या नियमबाह्य आंतरजिल्हा बदल्यांमुळे अतिरिक्त शिक्षकांचा अकरोशवर गेलेला आकडा वाढीव पायाभूत पदे, समायोजन व पदोन्नत्यांमुळे आता उपलब्ध पदांच्या बरोबरीत आला आहे. आजघडीला केवळ १५ अतिरिक्त शिक्षक आहेत; परंतु एकतर्फी आंतरजिल्हा बदलीने तेवढेच शिक्षक बाहेरच्या जिल्ह्यात जाणार आहेत. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांचा तिढा अखेर सुटला आहे.जिल्हा परिषदेत दोन वर्षांपूर्वी आंतरजिल्हा बदल्यांचा घोटाळा गाजला होता. तत्कालीन सीईओ राजीव जवळेकर यांना निलंबनाची किंमत मोजावी लागली होती. दरम्यान, अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना पदस्थापनेअभावी वर्ष - दोन वर्षे विनावेतन रहावे लागले होते. २७ नोव्हेंबर २०१५ रोजी ७९३ वाढीव पदे मिळाल्यानंतर सेवाज्येष्ठतेनुसार पदस्थापना देण्यात आल्या होत्या. उर्वरित शिक्षकांना जसजशा जागा रिक्त होतील, तसतशा पदस्थापना दिल्या होत्या. याउपरही १३९ शिक्षक अतिरिक्त होते. तथापि, जि.प. मध्ये नुकतेच तालुका व जिल्हास्तरावर समायोजन पार पडले. शिवाय रिक्त ४१ मुख्याध्यापकांची पदे पदोन्नतीने भरली. त्यामुळे केवळ १५ शिक्षक आजघडीला अतिरिक्त ठरले आहेत. बीडमधून आंतरजिल्हा बदलीने १५ शिक्षक परजिल्ह्यात जाणार आहेत. आंतरजिल्हा बदलीने जाणाऱ्या शिक्षकांच्या कार्यमुक्तीची संचिका तयार आहे. हे शिक्षक परजिल्ह्यात गेले तर जिल्ह्यात एकही शिक्षक अतिरिक्त राहणार नाही. (प्रतिनिधी)नुकत्याच पार पडलेल्या समायोजनातून ९४ अतिरिक्त शिक्षकांना पदस्थापना मिळाल्या. १९ शिक्षकांनी समायोजन प्रक्रियेवेळी दांडी मारली तर उर्वरित १३ जणांनी पदस्थापना नाकारली होती. या ३२ जणांना शनिवारी सीईओ नामदेव ननावरे यांनी रिक्त ठिकाणी तात्काळ रुजू होण्याचे आदेश दिले. रुजू न झाल्यास कारवाईची तंबीही दिली आहे. ‘नो वर्क, नो पेमेंट’ अशा स्पष्ट शब्दांत ननावरे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. सेवा खंडाची नोंद सेवापुस्तिकेत घेण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.वाढीव पायाभूत पदे मिळाल्यानंतरही जागा रिक्त होत्या. समायोजन, पदोन्नत्यांमुळे उर्वरित अतिरिक्त शिक्षकांनाही पदस्थापना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न कायमचा सुटला असूून ही मोठी उपलब्धी आहे.- बजरंग सोनवणे,शिक्षण व आरोग्य सभापती जि.प.
अतिरिक्त शिक्षकांचा तिढा अखेर सुटला
By admin | Updated: June 5, 2016 00:40 IST