सोयगाव : जिल्ह्यातील सहा तालुक्यांनी ग्रामपंचायतींच्या विजयी आणि पराभूत उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचे पारदर्शक विवरण तातडीने पाठविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी दिले. यामुळे तहसील कार्यालयांचा निवडणूक विभाग कामाला लागला आहे.
सिल्लोड, सोयगाव, कन्नड, खुलताबाद, वैजापूर आणि गंगापूर या सहा तालुक्यात डिसेंबर २०२० मध्ये काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडून नव्याने ग्रामपंचायती स्थापित झाल्या. या निवडणुकीतील उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाचा अहवाल नव्याने विहित नमुन्यात पाठविण्याचे आदेश जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी दिल्याने या सहा तहसील कार्यालयांचा निवडणूक विभाग खर्चाचा तपशील तपासण्याच्या कामात गुंतला आहे. खर्चाचा तपशील काटेकोरपणे तपासणी करून निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींची संख्या, एकूण उमेदवारांची संख्या विजयी, पराभूत, बिनविरोध याप्रमाणे माहिती विहित नमुन्यात पाठवून निवडणूक खर्च अप्राप्त व अपूर्ण असलेल्या उमेदवारांच्या यादीसह पाठविण्याचे आदेशात म्हटले आहे. यामुळे ज्या उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर केलेला नाही, त्यांच्यावर कारवाई होणार हे निश्चित आहे. सोयगाव तालुक्यात ८४ जणांवर कारवाईची टांगती तलवार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
चौकट
सोयगावात ८५५ उमेदवारांनी खर्च तपसील सादर केला.
सोयगाव तालुक्यात ४० ग्रामपंचायतीसाठी ९३९ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. त्यापैकी २७८ उमेदवार निवडणुकीने तर ९२ उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. यापैकी ८५५ उमेदवारांनी खर्चाचा तपशील सादर केलेला असून ५६९ उमेदवार पराभूत झालेले आहेत. यामध्ये ८४ उमेदवारांनी खर्चाचा तपशील अद्याप सोयगाव तहसील कार्यालयाला सादर केलेला नसल्याचे अंतिम अहवालात स्पष्ट झाले आहे. या ८४ जणांवर कारवाईची टांगती तलवार असल्याचे दिसत आहे.