रामेश्वर मछिंद्र ताजी (३१, रा. बकवालनगर, वाळूज) असे आरोपी चोरट्याचे नाव आहे. आरोपीच्या एका साथीदाराला ग्रामीण पोलिसांनी चार महिन्यांपूर्वी पकडले होते. तेव्हा त्याच्याकडून चोरीच्या २४ मोटारसायकल जप्त केल्या होत्या. त्यांच्या चौकशीत या सर्व दुचाकी आरोपी ताजीने चोरून आणून दिल्याची कबुली दिली होती. तेव्हापासून ताजी फरार होता. पोलीस त्याचा शोध घेत असतांना आरोपी बकवालनगर येथील घरी आल्याची खबर पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक फुंदे, फौजदार संदीप सोळंके, कर्मचारी श्रीमंत भालेराव, धीरज जाधव, बाळू पाथरीकर, राहुल पगार, संजय तांदळे आणि योगेश तरमाळे यांनी गुरूवारी सकाळी ताजीच्या घरावर धाड टाकली तेव्हा तो घरात सापडला. त्याच्या घरात तीन मोटारसायकल आढळून आल्या. चौकशीत यापैकी दोन मोटारसायकल शहरातील, तर एक मुंबईतील असल्याचे समोर आले. आरोपीने या गाड्या चोरीच्या असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याला अटक केली.
====
फायनान्स कंपनीच्या ओढून आणलेल्या मोटारसायकल असल्याची थाप मारून आरोपी खेड्यापाड्यातील शेतकरी आणि मजुरांना १५ ते २० हजारात मोटारसायकल विक्री करायचा. दुचाकीची कागदपत्रे नंतर देतो, अशी थाप मारत असे.