औरंगाबाद : रस्ता ओलांडण्यासाठी दोन महिला अचानक रस्त्यावर आल्याचे पाहून भरधाव दुचाकीचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात तो गंभीर जखमी झाला. त्याच्यासोबत असलेल्या तरुणाला आणि रस्ता ओलांडणाऱ्या महिलांनाही किरकोळ मार लागला. हा अपघात जालना रोडवरील सेव्हन हिल उड्डाणपुलाजवळील हॉटेल यशोदीपजवळ रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडला.शाहिद चाँद खान पठाण (१९, रा. मोतीवालानगर, चिकलठाणा) असे गंभीर जखमी झालेल्या दुचाकीचालकाचे नाव आहे. शाहिद पठाण व त्याचा मित्र शेख असिफ शेख मंजूर हे स्पोर्टस् मोटारसायकलने (क्रमांक एमएच-२० डीयू ००४५) आकाशवाणी चौकाकडून चिकलठाण्याकडे जात होते. सेव्हन हिल उड्डाणपुलाजवळ त्यांची दुचाकी असताना दोन महिला अचानक रस्ता ओलांडत असल्याचे शाहिदला दिसले. त्याने गाडीला ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि अखेर त्या महिलांना उडवत त्यांची दुचाकी घसरली. शाहिदच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने घटनास्थळ रक्ताने माखले. तो बेशुद्ध झाला. असिफला किरकोळ मार लागला. रस्ता ओलांडणाऱ्या महिलाही जखमी झाल्या. माहिती मिळताच जिन्सी पोलीस ठाण्याचे फौजदार एस. व्ही. तायडे, पोलीस कर्मचारी कावरे, शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली. शाहिदला असिफने घाटीत दाखल केले तर जखमी महिलांना एमजीएम रुग्णालयात दाखल केले. जखमी महिलांची नावे समजू शकली नाहीत.
महिलांना वाचविताना अपघात
By admin | Updated: January 11, 2016 00:07 IST