नांदेड : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम - २००९ अंतर्गत वंचित, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अपंग विद्यार्थ्यांना खाजगी शाळेत २५ टक्के या प्रमाणातील मोफत प्रवेशाला वेबसाईटवरील तांत्रिक अडचणीमुळे ब्रेक मिळाला आहे़ त्यामुळे प्रवेशाबाबत पालकांमध्ये गोंधळ उडाला असून जि़ प़ शिक्षण विभागाचे मदत केंद्रही कुचकामी ठरले आहेत़ आरटीई अंतर्गत २५ टक्के आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक शासनाने जाहीर केले़ त्यानंतरनांदेड जिल्ह्यातील शाळा प्रवेशासाठी २९ फेब्रुवारीपासून शाळांच्या आॅनलाईन नोंदणीला सुरूवात झाली़ ११ ते २८ मार्च या कालावधीत पालकांकडून प्रवेश अर्ज स्वीकारण्यात येणार होते़ त्यासाठी पालकांनी आपल्या जवळच्या खाजगी इंग्रजी शाळेत धावही घेतली़ मात्र वेबसाईट बंद असल्यामुळे प्रवेश प्रक्रियेला खीळ बसली़ यासंदर्भात उपशिक्षणाधिकारी शिवाजी खुडे म्हणाले, स्वयंअर्थसहाय्यीत, विनाअनुदानीत, कायमविनाअनुदानीत इंग्रजी, मराठी शाळेत इयत्ता पहिली अथवा प्रवेशवर्गापासून विद्यार्थ्यांना आॅनलाईन प्रवेश मिळणार आहे़ मात्र वेबसाईटवरील तांत्रिक अडचणीमुळे ही प्रक्रिया पुढे ढकलली आहे़ त्याचे सुधारित वेळापत्रक नंतर कळविण्यात येईल़ संबंधित शाळा व २५ टक्के प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांनी याची नोंद घ्यावी़ नोंदणी करताना पालकांचे रहिवाशी प्रमाणपत्र आवश्यक केले असून विद्यार्थी ज्या भागात राहतो तेथील १ कि़ मी़ अंतरातील शाळेतच त्या विद्यार्थ्याला प्रवेशासाठी प्राधान्य देण्यात येईल़ जिल्ह्यातील नामांकित खाजगी इंग्रजी शाळांचे शैक्षणिक शुल्क मोठ्या प्रमाणात आहे़ त्यामुळे आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेले पालक आपल्या पाल्यांना अशा शाळेत प्रवेश देवू शकत नव्हते़ ही बाब समोर आल्यानंतर शासनाने आरटीई अंतर्गत अशा शाळेत मोफत प्रवेश देणे बंधनकारक केले़
आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया खोळंबली
By admin | Updated: March 18, 2016 00:18 IST