छत्रपती संभाजीनगर : नांदेड येथील जनक रामराव गायकवाड या अपिलार्थीने राज्य माहिती आयोगाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाकडे ‘माहितीचा अधिकार अधिनियमांतर्गत’ दाखल केलेले ८१ द्वितीय अपील आयोगाने फेटाळले आहेत. तसेच इतर १९ अपिलार्थींनी दाखल केलेले ७ हजार ५६७ द्वितीय अपील आयोगाने सुनावणी घेऊन फेटाळले आहेत, अशी माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
शासकीय कामकाजावर विपरीत परिणामबहुतांश अपिलार्थी वारंवार अर्ज करून व्यक्तिशः माहितीची मागणी करतात. मात्र, माहिती प्राप्त करून घेण्यासाठी कार्यालयात उपस्थित राहत नाहीत. अपिलार्थींनी जितक्या ग्रामपंचायतींकडे माहिती अर्ज सादर केले तेथे स्वतंत्र जन माहिती अधिकारी पदनिर्देशित आहेत. मात्र, अशा सर्व जन माहिती अधिकाऱ्यांसाठी केवळ ‘एकच प्रथम अपिलीय अधिकारी’ पदनिर्देशित आहेत. बहुतांश वेळा अपिलार्थी जेवढे माहितीचे अर्ज दाखल करतात, जवळजवळ तेवढीच प्रथम अपिले दाखल करतात. अशा परिस्थितीत दैनंदिन कामकाज सांभाळून दाखल प्रथम अपिलावर कार्यवाही करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. मोठ्या संख्येने प्राप्त झालेल्या अर्जांचा विपरीत परिणाम दैनंदिन शासकीय कामकाजावर होऊन सर्वसामान्य नागरिकांना नैसर्गिक न्याय देता येणे शक्य होत नाही. या अपिलार्थीने विविध ग्रामपंचायतींकडे ८१ माहितीचे अर्ज सादर केले आहेत. त्यांची द्वितीय अपिले आयोगाने सुनावणी घेऊन फेटाळली आहेत.
‘हे’ माहिती अधिकार कायद्यात अभिप्रेत नाहीसंबंधितांनी आयोगासमोर केलेला युक्तिवाद तसेच सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, केंद्रीय व राज्य माहिती आयोग यांनी वेळोवेळी पारित केलेले निर्णय विचारात घेता, एकाच व्यक्तीने मोठ्या संख्येने माहिती अधिकार कायद्याखाली माहिती अर्ज अपिले करणे माहिती अधिकार कायद्यामध्ये अभिप्रेत नाही. यावरून अपिलार्थी माहिती अधिकार कायद्याचा मोठ्या प्रमाणावर दुरुपयोग करून संबंधित शासकीय कार्यालयास वेठीस धरत आहेत. अपिलार्थींनी मागणी केलेल्या माहितीतून कोणतेही व्यापक जनहित साध्य होत नाही. सर्वसामान्य नागरिकांची दैनंदिन शासकीय कामे पूर्ण करण्याच्या क्षमतेवर विपरीत परिणाम होतो, असे आयोगाचे स्पष्ट मत असल्याचे म्हटले आहे.