छत्रपती संभाजीनगर : महापालिकेने शहरात रस्ता रुंदीकरण मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेला तूर्त पोलीस बंदोबस्त न देण्याचा निर्णय सोमवारी रात्री पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी घेतला. वाळूज एमआयडीसी भागातील दीड हजार अतिक्रमणे काढण्यासाठी पोलिस बंदोबस्त देण्यात येणार आहे. महापालिकेला ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बंदोबस्त मिळेल.
पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी रात्री बैठक घेण्यात आली. बैठकीस एमआयडीसी, सिडको आणि मनपाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी आतापर्यंतच्या कारवाईचा पवार यांनी आढावा घेतला. महापालिकेने रस्ता रुंदीकरणासाठी ज्या भागात मार्किंग केले, नागरिकांना पूर्वसूचना देण्यासाठी भोंगा फिरविला त्या भागात मालमत्ताधारकांचे प्रश्न समजून घ्यावेत. त्यासाठी पोलिस आणि मनपाच्या वॉर्ड अधिकाऱ्यांनी संयुक्त बैठका घ्याव्यात, अशी सूचनाही त्यांनी केली.
एमआयडीसी प्रशासनाने वाळूज भागातील दीड हजारांवर अतिक्रमणे काढण्यासाठी बंदोबस्त देण्याची मागणी केली आहे. त्यांना या आठवड्यात बंदोबस्त देण्यात येणार असल्याचे आयुक्त म्हणाले. वाळूज भागात ५६ धार्मिक स्थळेही अतिक्रमणात येत आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी आणि सामंजस्याने कारवाई व्हावी यासाठी बंदोबस्त देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
हर्सूलकरांना तूर्त दिलासाहर्सूल येथील रस्ता रुंद करण्यासाठी महापालिकेने मंगळवारी कारवाईचे संकेत दिले होते. त्यामुळे मालमत्ताधारक हवालदिल झाले होते. आता पोलीस आयुक्तांच्या निर्णयामुळे हर्सूलकरांना तूर्त काही दिवस दिलासा मिळाला आहे.