औरंगाबाद: तुमचे मागील महिन्याचे वीज बिल आमच्या ऑफिसमध्ये अपडेट नसल्याने तुमची वीज आज रात्री बंद होणार असून, तात्काळ आमच्या ऑफिसला संपर्क साधा, असा मेसेज पाठवून भामट्याने नोकरदराला ८६ हजार २९५ रुपयांचा गंडा घातला. हा प्रकार २९ ऑक्टोबर रोजी दुपारी महेश ऑटो, चुन्नीलाल पेट्रोल पंप शेजारी घडला.
जावेद खान इस्माईल खान (रा. शाहनगर, बीड बायपास) यांना एका भामट्याने महाराष्ट्र स्टेट पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडचा मेसेज पाठविला. त्यात ‘तुमचे मागील महिन्याचे वीज बिल आमच्या वीज कार्यालयाकडे अपडेट न झाल्याने आज रात्री साडेनऊ वाजता तुमची वीज कापली जाणार आहे. त्यामुळे तुम्ही तात्काळ आमच्या ऑफिसशी संपर्क साधा,’ असा मजकूर टाकून एक मोबाइल क्रमांक दिला.
मेसेज पाहून जावेद खान घाबरले. त्यांनी दिलेल्या मोबाइल क्रमांकावर तात्काळ संपर्क साधला. तेव्हा भामट्याने त्याचे नाव राकेश सिंग असल्याचे सांगून जावेद खान यांची दिशाभूल करून त्यांच्या बँक खात्यातून ८६ हजार २९५ रुपये ऑनलाइन स्वतःच्या खात्यात वळते करून फसवणूक केली. याप्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला. अधिक तपास निरीक्षक सुशील जुमडे करीत आहेत.