महापालिका मुख्यालयासमोर सिमेंट रस्त्यावर पार्किंग
औरंगाबाद : महापालिकेच्या प्रशासकीय इमारत टप्पा क्रमांक- ३ समोरील सिमेंट रस्त्यावर मागील काही दिवसांपासून दुचाकी आणि चारचाकी वाहने उभी करण्यात येत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. मनपा मुख्यालयातील पार्किंगमधून बाहेर पडणाऱ्या कर्मचाऱ्यांना रस्त्यावरील ये-जा करणारे वाहन दिसत नसल्यामुळे लहान-मोठे अपघातही झाले आहेत. महापालिका प्रशासनाने कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करावी. संपूर्ण शहराला कायद्याचे ज्ञान देणाऱ्या महापालिकेला साध्या पार्किंगची व्यवस्था करता होत नाही, हे विशेष.
वसुलीसाठी मनपाकडे १३५ कर्मचारी तरीही
औरंगाबाद : महापालिकेने मालमत्ता कर आणि पाणीपट्टीच्या वसुलीसाठी प्रत्येक वाॅर्ड कार्यालयात कंत्राटी १३५ कर्मचारी नेमले आहेत. एका वाॅर्ड कार्यालयात किमान १५ ते २० कर्मचारी आहेत. खास वसुलीसाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांकडून मागील काही दिवसांपासून वसुली अजिबात होत नसल्याचे दिसून येत आहे. कंत्राटी स्वरूपातील कर्मचारी नेमके करतात तरी काय? याचा आढावा घेण्यास प्रशासन तयार नाही. या कर्मचाऱ्यांच्या पगारावर महापालिका प्रशासनाला दरमहा २० लाख रुपये खर्च येतो.
सिद्धार्थ उद्यान बंद असल्याचा फायदा...
औरंगाबाद : कोरोनामुळे शासनाने सर्व उद्याने बंद ठेवण्याचे आदेश दिले. उद्यान उघडण्यासंदर्भात शासनाकडून कोणतेही आदेश आलेले नाहीत. त्यामुळे आजही सिद्धार्थ उद्यान बंदच आहे. उद्यान बंद असल्याने प्रशासनाकडून छोटी-मोठी डागडुजीची कामे सुरू आहेत. ही कामे नेमकं कोण करतंय? याचा प्रशासनाने शोध घेण्याची गरज आहे. उद्यान बंद असल्याचा फायदा उचलून काही विकासकामे थातूरमातूर करण्यात येत आहेत. नाव कंत्राटदारांचे आणि काम करणारे वेगळेच आहेत. प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी केल्यास अनेक धक्कादायक प्रकरणे समोर येऊ शकतील.