छत्रपती संभाजीनगर : नवरात्रोत्सवाला रविवारी, दि. १५ ऑक्टोबर रोजी सुरुवात होत आहे. यानिमित्त जिल्ह्यातील सर्वात मोठ्या कर्णपुरा यात्रेलाही त्याच दिवशी प्रारंभ होईल. या यात्रेत राज्य व परराज्यातील व्यावसायिक येणे सुरू झाले आहे. यात्रा भरविणे व पार्किंगच्या टेंडरच्या रूपात घटस्थापनेआधी छावणी परिषदेच्या तिजोरीत ८६ लाख रुपये जमा होणार आहेत.
छावणीतील कर्णपुरा परिसरातील ३ ते ४ एकर परिसरात भव्य यात्रा भरत असते. येथील देवीच्या दर्शनाला दररोज लाखो भाविक येत असतात. यामुळे पूजेच्या साहित्यापासून ते आकाशपाळण्यापर्यंत येथे १ हजारापेक्षा अधिक लहान-मोठे व्यावसायिक सहभागी होत असतात. १० दिवसात कोट्यवधींची उलाढाल येथे होत असते. छावणी परिषदेकडे येथील जमिनीचा ताबा आहे. दरवर्षी टेंडर काढून १० दिवसांसाठी जागा भाड्याने दिली जाते. यंदा यात्रा भरविण्याचे टेंडर ८१ लाखाला पास झाले आहे, तर पार्किंगचे टेंडर ४ लाख ७६ हजार रुपयांना पास झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. असे ८६ लाख रुपये छावणी परिषदेच्या तिजोरीत जमा होणार आहेत.
यंदा सर्वात मोठे मनोरंजन झोनयंदा कर्णपुरा यात्रेत मनोरंजन झोन, खाद्यपदार्थ, कटलरी, पूजेचे साहित्य असे चार भाग पाडण्यात येतात. यंदा सर्वात ७० टक्के जागा ही मनोरंजन झोनसाठी देण्यात आली आहे. आज विक्रेत्यांना जागा वाटप करण्यात आले. यामुळे कर्णपुऱ्यात मोठी गर्दी जमली होती. मोक्याच्या ठिकाणी आपली दुकाने पाहिजेत, यासाठी अनेक जण जास्त पैसे देण्यासही तयार असल्याचे बघण्यास मिळाले.
गगनचुंबी १० आकाशपाळणे वेधून घेणार लक्षपंचवटी चौकातून कर्णपुरा यात्रेत प्रवेश करताच समोर उजव्या व डाव्या बाजूस १० गगनचुंबी आकाशपाळणे नजरेस पडतात. नवरात्रोत्सवादरम्यान दररोज हजारो लोक या आकाशपाळण्याचा आनंद लुटतील.