देवणी : येथील महादेव यात्रेला ८२ वर्षांची परंपरा लाभली असून, यावर्षीही ही पंरपरा जोमाने जोपासली जात आहे़ विविध ठिकाणांहून जमणाऱ्या कावड्या अन् महादेव-पार्वतीचा भव्य विवाह सोहळा हे येथील यात्रेचे एक मोठे वैशिष्ट्य आहे़देवणी शहरातील देवनदीच्या तीरावर जवळपास ७०० वर्षांपूर्वीचे महादेवाचे हेमाडपंथी मंदिर आहे़ शिखर शिंगणापूरनंतर देवणीतच दोन शिवलिंग असलेले हे मंदिर असल्याचे सांगण्यात येते़ तसेच शिव-पार्वती भ्रमंतीदरम्यान येथूनच गेल्याची आख्यायिका सांगण्यात येते़ त्यामुळे गौरवशाली इतिहास लाभलेल्या या मंदिराचे महत्त्व ठळकपणे अधोरेखित करण्याच्या दृष्टिकोनातून १९३५ साली देवणीतील कै़राचप्पा पाटील, कैग़दगेप्पा मानकरी, कै़रामशेट्टी बिरादार, कै़महादप्पा बोंद्रे व गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन यात्रा महोत्सव सुरु केला़ तेव्हापासून ही परंपरा अव्याहतपणे सुरु आहे़ चैैत्र त्रयोदशीला यात्रा भरवून शिव-पार्वतीचा विवाह सोहळा थाटात लावला जातो़ त्यासाठी सताळा, करखेली, चिघळी, शिरमाळी तसेच स्थानिकच्या मानकरी व बोंद्रे परिवाराच्या कावड्यांना मानाचे निमंत्रण धाडले जाते़ तत्पूर्वी मंदिरात सप्ताहभर विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात येतात़ २८ मार्चपासून त्यांना सुरुवात झाली आहे़ दरम्यान, ९ एप्रिल रोजी शिव-पार्वती विवाह सोहळा १़०५ वाजण्याच्या मुहूर्तावर पार पडणार आहे़ याच दिवशी नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या वतीने पशुप्रदर्शन घेण्यात येत आहे़ त्याचे उद्घाटन दुपारी १२ वाजता पालकमंत्री संभाजीराव पाटील करणार आहेत़ १० एप्रिल रोजी जंगी कुस्त्या होणार आहेत़ त्यासाठी पहिले बक्षीस कैै़बाबुराव पडीले यांच्या स्मरणार्थ ११ हजार रुपये तर द्वितीय बक्षीस शिवदीप व शिवगणेश मेडिकलकडून ७ हजार १५१ रुपये दिले जाणार आहेत़ सायंकाळी मानाच्या कावड्यांना निरोप देऊन यात्रेचा समारोप होणार आहे़ यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन यात्रा समितीचे अध्यक्ष प्रा़ रेवण मळभागे, सचिव बस्वराज बिरादार, नगराध्यक्षा विद्यावती मन्सुरे, उपाध्यक्षा अंजली जीवने, मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली यांनी केले आहे़
देवणीच्या यात्रेला ८२ वर्षांची परंपरा
By admin | Updated: April 8, 2017 21:45 IST