औरंगाबाद : मराठवाड्यातील ८ धरणे तुडुंब भरली असून, जायकवाडी धरणात जलसाठा ७५ टक्के झाला आहे. खडका बंधारा १०० टक्के भरल्याने तो आता ओसंडून वाहत आहे. ८ धरणांमध्ये निम्न दुधना, येलदरी, सिद्धेश्वर, माजलगाव, मांजरा, पैनगंगा, मानार, विष्णुपुरी या धरणांचा समावेश आहे.
सर्व ११ प्रकल्प आणि दोन बंधाऱ्यांत ५ हजार १६५ दशलक्ष घनमीटर उपयुक्त जलसाठ्याची क्षमता आहे. सर्व प्रकल्प आणि बंधाऱ्यांत २२ सप्टेंबरपर्यंत ४ हजार ४७८ दशलक्ष घनमीटर उपयुक्त जलसाठा आला आहे. विभागात मागील वर्षी ४ हजार ५५९ दशलक्ष घनमीटर उपयुक्त जलसाठा होता. विभागातील प्रकल्पांत समाधानकारक पाणी आल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. जायकवाडी धरणात १६०२ दशलक्ष घनमीटर उपयुक्त जलसाठा आहे. नाशिककडून पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे जायकवाडीच्या साठ्यात या आठवड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी जायकवाडी आजच्या तारखेपर्यंत तुडुंब भरले होते. धरणातून पाण्याचा विसर्ग करणे सुरू होते. अद्याप जायकवाडीतून पाण्याचा विसर्ग सुरू केलेला नाही.
मोठ्या प्रकल्प, बंधाऱ्यांतील जलसाठा
जायकवाडी ७५ टक्के,
निम्न दुधना १०० टक्के,
येलदरी १०० टक्के,
सिद्धेश्वर १०० टक्के,
मालजगाव ९९ टक्के,
मांजरा १०० टक्के,
पेनगंगा १०० टक्के,
मानार १०० टक्के,
निम्न तेरणा ७६ टक्के,
विष्णुपुरी १०० टक्के
सीना कोळेगाव ४३ टक्के
शहागड बंधारा ५० टक्के
खडका बंधारा १०० टक्के