अनिल भंडारी।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्हयात नाफेड आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने मागील सहा महिन्यात खरेदी केलेल्या ४ लाख ३८ हजार क्विंटल तुरीपैकी १ लाख २८ हजार ३६८ क्विंटल तुरीचे सुमारे ६४ कोटी रुपयांच्या धनादेशाची तूर उत्पादक शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. तर खरेदी केलेली ४० हजार क्विंटल तूर साठविण्यासाठी औरंगाबाद, उदगीर येथील गोदामात पाठविली जात आहे. मागील वर्षी चांगल्या पावसामुळे तुरीचे बंपर पीक आले होते. खुल्या बाजारात शेतकऱ्यांची लूट होऊ नये म्हणून शासनाने प्रती क्विंटल ४ हजार ६२५ आणि बोनस ४२५ रुपये असा हमीदर जाहीर केला होता. बीड जिल्ह्यात अकरा खरेदी केंद्रांवरुन सुरुवातीला नाफेड आणि नंतर महाराष्ट्र शासनाच्या वतीने तूर खरेदी करण्यात आली. १६ डिसेंबर ते १० जूनपर्यंत ३७ हजार २४४ क्विंटल तूर खरेदी झाली. तूर खरेदी केंद्रांवर मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने आणि पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्याने वजन मापे होण्यासाठी लागणारा विलंब तसेच टोकन घेण्यापासून तुरीचे माप होईपर्यंत शेतकऱ्यांना रात्रंदिवस स्वत: राखण करावी लागली. खरेदी केलेली तूर साठविण्यासाठी गोदामांची कमतरता, बारदान्याचा अभाव यामुळे शासनाकडून तूर खरेदी बंद करण्याचे आदेश निघायचे, त्यामुळे संभ्रमाचे वातावरण राहिले. या सर्व बाबींमुळे तूर उत्पादकांमध्ये नाराजीचा सूर वारंवार उमटत होता.सहा महिन्यात ३७ हजार २४४ शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात आली. या तुरीची रक्कम २२१ कोटी ३५ लाख ५० हजार रुपये होते. शासनाला तूर विक्री करणाऱ्या जिल्ह्यातील उत्पादकांना एवढी रक्कम मिळणे अपेक्षित आहे. यापैकी ३ लाख ९ हजार ९५७ क्विंटल तुरीचे १५६ कोटी ५२ लाख ८७ हजार रुपयांचे धनादेश संबंधित शेतकऱ्यांना वाटप झाल्याचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी एस. के. पांडव यांनी सांगितले. दरम्यान खरेदी केलेल्या एकुण तुरीपैकी १ लाख २८ हजार ३६८ क्विंटल तुरीचे सुमारे ६४ कोटी ८२ लाख ६२ हजार रुपये शासनाकडून मिळणे बाकी आहे. १० जून रोजी तूर खरेदी बंद झाली. खरेदी केलेल्या तुरीची बीड, गेवराई, वडवणी, परळीतील वखार महामंडळाच्या गोदामात साठवणूक झाली आहे. खरेदी केलेल्या ४० हजार क्विंटल तुरीची साठवणुक कशी करायची असा स्थानिक व्यवस्थापनापुढे पेच उभा राहिला. गोदाम भरल्याने राहिलेली उर्वरित तूर साठविण्यासाठी औरंगाबाद, उदगीर येथील गोदामात पाठविली जात आहे.
तुरीचे ६४ कोटी अडकले
By admin | Updated: June 26, 2017 00:36 IST