हिंगोली : आघाडी सरकारने मूळ वीजबिलाच्या ५० टक्के रक्कम भरून १०० टक्के बिल माफ करण्याची योजना जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांना ‘संजीवनी’ मिळाली आहे. शिवाय थकबाकीवरील व्याज आणि दंडही माफ केला जाणार असून एक किंवा तीन टप्प्यात ही रक्कम भरता येणार आहे. जिल्ह्यात १ लाख ३९ हजार ६७७ महावितरणच्या ग्राहकांची संख्या आहे. त्यात कृषीपंपधारकांची संख्या ६० हजारांच्या घरात आहे. महावितरणच्या इतर ग्राहकांच्या तुलनेत कृषीपंपधारकांना मोठ्या प्रमाणात वीज लागते. सध्या कृषीपंपाच्या एका युनिटसाठी महावितरणला २७ रूपये मोजावे लागतात; परंतु महावितरण शेतकऱ्यांना ६ रूपये प्रतियुनिट अशी दर आकारणी करते. एवढी कमी आकारणी असतानाही कृषीपंपधारकांनी नियमित विजबिले भरलेली नाहीत. परिणामी, मोठ्या प्रमाणात थकबाकी वाढल्याने गतवर्षी थकबाकीदारांची वीज तोडण्याचे आदेश राज्य शासनाने दिले होते. तेव्हा मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील कृषी उत्पादकांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले होते. त्यानंतर शेतकऱ्यांनी या वीज तोडणीविरोधात नाराजी व्यक्त केल्याने जिल्ह्यातील वीज तोडणी थांबविण्यात आली. आता आगामी विधासभेची निवडणूक तोंडावर आल्याने उत्पादकांना खुश ठेवण्यासाठी राज्य शासनाने कृषी संजीवनी योजना नुकतीच जाहीर केली. प्रामुख्याने त्यात मूळ रकमेच्या ५० टक्के बिले भरून १०० टक्के वीज बिले माफ होणार आहेत. शिवाय शेतकऱ्यांना तीन टप्प्यांत रक्कम भरण्याची सवलत देण्यात आली आहे. आजघडीला त्याचा लाभ जिल्ह्यातील ६० हजार कृषीपंपधारकांना होणार आहे. त्याचा लाभ हिंगोली तालुक्यातील १० हजार ५०० कृषीपंपधारकांना होणार असल्याचे अभियंता पी.एम. पाठक यांनी सांगितले. बागायती शेतीचे प्रमाण अधिक असल्याने वसमत तालुक्यात कृषीपंपधारकांची संख्या २० हजारांच्या घरात आहे. त्यानंतर कळमनुरी तालुक्यात १० हजार ८७८ ग्राहकांकडे २४ कोटी रूपयांची थकबाकी आहे. सेनगाव तालुक्यात १० हजार ५९३ कृषीपंपधारकांकडे २६ कोटी २४ लाख रूपयांची थकबाकी आहे; मात्र त्यात मार्चअखेर २६ कोटी २४ लाखांची मूळ थकबाकी आहे; परंतु नियमित बिले भरली नसल्याने उत्पादकांना २२ कोटी ११ लाख रूपयांचे व्याज आणि ५२ लाख रूपयांचा दंड लागला. परिणामी, ४८ कोटी ८८ लाख रूपयांवर बिलाची रक्कम गेली. मात्र संजीवनी योजनेत तालुक्यातील शेतकऱ्यांनी २६ कोटी २४ लाख रूपये भरले तर व्याज आणि दंड माफ होणार असल्याचे सेनगावचे अभियंता अनिल जीवनानी यांनी सांगितले. औंढा नागनाथ तालुक्यात कृषीपंपधारकांची संख्या १० हजार एवढी आहे. जिल्ह्यातील पाच उपविभागातील कृषीपंपधारकांकडे एकूण २८२ कोटींची थकबाकी आहे. मुळात बिलांची रक्कम कमी असून व्याज आणि दंडामुळे एकूण थकबाकीचा आकडा फुगला; परंतु प्रतिवर्षीची जिल्ह्याची उत्पादकता पाहता २८२ कोटींची रक्कम डोईजड झाली होती. आता संजीवनी योजनेमुळे कृषीपंपधारकांना एकूण बिलाच्या ५० टक्के बिल भरावयाचे आहे. प्रामुख्याने त्यानुसार जिल्ह्यात ७० कोटी रूपयांची रक्कम भरल्यास २८२ कोटींची थकबाकी माफ होणार आहे. शिवाय उत्पादकांना तीन हप्त्यांत रक्कम भरता येणार आहे. पहिला हप्ता आॅगस्टअखेरपर्यंत भरता येणार आहे. उर्वरित दोन्ही हप्त्यांसाठी ३० सप्टेंबर आणि ३१ आॅक्टोबर २०१४ पर्यंतची मुदत आहे. उत्पादकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन हिंगोलीचे अधीक्षक अभियंता एच.के. रणदिवे यांनी केले आहे.या योजनेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे महावितरणची वीजबिल वसुली होण्यास मदत होत आहे. आगामी काळात आणखी शेतकरी लाभ घेतील, अशी महावितरणला अपेक्षा आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्यात महावितरणच्या १ लाख ३९ हजार ६७७ पैकी ६० हजारांच्या आसपास आहेत कृषीपंपधारककृषीपंपाच्या एका युनिटसाठी महावितरणला २७ रूपये मोजावे लागतात; परंतु शेतकऱ्यांकडून महावितरण ६ रूपये दराने एका युनिटची आकारणी करते. आता आगामी विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्याने उत्पादकांना खुश ठेवण्यासाठी राज्य शासनाने केली कृषी संजीवनी योजना जाहीर योजनेत मूळ रकमेच्या ५० टक्के बिले भरून १०० टक्के वीजबिले माफ होणार असून शेतकऱ्यांना तीन टप्प्यात रक्कम भरण्याची देण्यात आली सवलत. कळमनुरी तालुक्यात १० हजार ८७८ ग्राहकांकडे २४ कोटी रूपयांची थकबाकी असल्याने तेथील कृषीपंपधारकांना होणार लाभ.सेनगाव तालुक्यात २२ कोटी ११ लाख रूपयांचे व्याज आणि ५२ लाख रूपयांचा दंड लागल्याने ४८ कोटी ८८ लाखांवर गेले वीजबिल.
६० हजार शेतकऱ्यांना ‘संजीवनी’
By admin | Updated: July 27, 2014 01:17 IST