लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ (जि. हिंगोली) : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी वीज ग्राहकांकडून प्रतिवर्षी अॅडिशनल सेक्युरिटी बिलाच्या नावाखाली रक्कम उकळत असून त्याचे ६0२५ कोटी रुपये जमा आहेत. त्यावर कोणतेही व्याज दिले जात नसल्याचा प्रकार माहिती अधिकारात उघड झाला आहे.नॅशनल एससी, एसटी, ओबीसी स्टुडंट्स अँड युथ फ्रंट (एनएसओएसवायएफ) चे राज्य सहसचिव अॅड. स्वप्नील मुळे यांनी उर्जा मंत्रालयास माहिती अधिकारात ही माहिती विचारली होती. अतिरिक्त सुरक्षा बिल हे कोणत्या नियमानुसार घेता येते, त्याचा विनियोग कसा केला जातो, महाराष्ट्रात अशी किती रक्कम आपल्याकडे जमा आहे, हिंगोली जिल्ह्यातील किती ग्राहकांना ही अनामत रक्कम परत करण्यात आली आदी प्रश्न विचारले होते. यावर मंत्रालयातील कक्ष अधिकारी उ.ल.खोपडे यांनी हा अर्ज महावितरणच्या प्रकाशगड, वांद्रे (पूर्व), मुंबई येथील मुख्य कार्यकारी अभियंत्याकडे पाठवून माहिती देण्याचे निर्देश दिले. त्यांनी दिलेल्या माहितीमधून असे स्पष्ट झाले की, सदर रक्कम ही ग्राहकाने परत मागितली तर परत करणे आवश्यक आहे. परंतु ग्राहकांना हे माहिती नाही अन् महावितरण तशी जागृती करीत नाही. अशी प्रतिवर्षी भरलेली अनामत रक्कम जितके दिवस कंपनीकडे जमा असेल तेवढ्या वर्षांचे प्रतिवर्षी १०.७५% दराने व्याज ग्राहकांना मिळणे अपेक्षित आहे. अन्यथा त्यांच्या पुढील बीलातून कपात करावे लागतात. परंतु ग्राहकांच्या आजवरच्या बिलांची तपासणी केली असता व्याजही नाही अन् बिलातून रक्कम कपातही होत नाही. उलट एक महिना बिल थकले की जोडणी तोडली जाते, असे मुळे यांचे म्हणणे आहे. महाराष्ट्रात दि.३१ मार्च २०१७ अखेर महावितरणकडे सुरक्षा अनामतीची रक्कम रु.६०७५.६३ कोटी असून महावितरण त्यावर व्याज मिळवत आहे. मात्र ते ग्राहकांना दिले का जात नाही, हा संशोधनाचा विषय आहे. ते दिले जात नसल्यास हा शासनमान्य घोटाळाच असून हा विषय आमदारांनीच विधिमंडळात मांडणे आवश्यक आहे.
वीज कंपनीने अतिरिक्त सुरक्षा बिलातून जमविले ६ हजार कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 00:22 IST