औरंगाबाद : धातूचे भाव वाढल्याने शहरातील भांडीबाजारात सध्या जुन्या भांड्यांची मोड विकण्यासाठी ग्राहक येत आहेत. तांबे, पितळ, स्टील, जर्मनच्या भावात वाढ झाल्याने घरात अडगळीत पडलेले भांडे विक्रीसाठी आणले जात आहेत. या मोडीच्या व्यवसायात दररोज ५ लाखांची उलाढाल होते आहे.
कोरोना काळापासून लोक जागरूक झाले आहेत. तांब्याचे भांडे, हंडा किंवा बाटलीतील पाणी अनेक जण पीत आहेत. यामुळे तांब्याला देशभरात मागणी वाढली आहे. मागणी वाढल्याने त्याचा परिणाम तांब्याच्या किमतीवर झाला आहे. ३०० रुपयांनी वाढ होऊन नवीन तांबे ९०० ते २ हजार रुपये प्रतिकिलोपर्यंत विकत आहे. तांब्यापाठोपाठ पितळाचे भाव २०० रुपयांनी वधारून ८०० ते १६०० रुपये किलो, तर स्टील १०० ते १५० रुपयांनी चढून २५० ते ६०० रुपये झाले आहे. या भाववाढीमुळे भांडीबाजाराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. घरातील जुने, फुटलेले तांबे, पितळी भांडी, स्टील बादल्या ग्राहकांनी मोडीत काढणे सुरू केले आहे. जुनी मोड देऊन त्यात आणखी रक्कम टाकून नवीन भांडी खरेदी केली जातात. तांब्याच्या मोडमध्ये २०० रुपये वाढून ४०० ते ६०० रुपये किलो मोड खरेदी केली जात आहे. पितळीच्या मोडमध्ये २०० रुपयांनी तेजी येऊन सध्या ६०० ते ६५० रुपये, तर स्टीलची मोड ६० रुपये किलोने खरेदी केली जात आहे.
भांडीबाजारात दररोज नवीन भांडे विक्रीत २० लाखांपर्यंत उलाढाल होत आहे, तर ५ लाखांपर्यंतची मोड खरेदी केली जात असल्याची माहिती भांडी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नितीन पातूरकर यांनी दिली.
चौकट
जर्मनला १० वर्षांनंतर चढला भाव
भांड्याचे व्यापारी तेजपाल जैन यांनी सांगितले की, आता तांबे, पितळ व स्टीलला बाजारात मागणी आहे. ॲल्युमिनियम (जर्मन) भांड्याला मागणी त्या तुलनेत खूप कमी आहे. तब्बल १० वर्षांनंतर जर्मनच्या किमती २०० ते २५० रुपयांनी वाढल्या आहेत. नवीन जर्मनचे भाव ३५० त ६०० रुपये प्रतिकिलोदरम्यान आहे. परिणामी ४० ते ५० रुपये किलोने मोड महागून १६० ते १८० रुपये किलोने खरेदी केली जात आहे.