औरंगाबाद : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रेंगाळलेल्या कामांना बांधकाम तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी संबंधित अधिकाऱ्यांना ३१ आॅक्टोबरची डेडलाईन दिली. मागील चार वर्षांपासून पाटील हे दरवेळी ३१ आॅक्टोबरची डेडलाईन देत आले आहेत. परंतु त्यातून किती आऊटपुट मिळाले, याचे परीक्षण कोण करणार, असा प्रश्न आहे.
सार्वजनिक बांधकाममंत्री पाटील यांनी बुधवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरून विभागातील रेंगाळलेल्या व प्रगतिपथावर असलेल्या कामांचा आढावा घेतला. परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांत झालेल्या पावसामुळे बांधकाम विभागाच्या रस्त्यांची अवस्था या बैठकीत जाणून घेण्यात आली. या बैठकीबाबत विचारले असता विभागाचे मुख्य अभियंता खंडेराव पाटील यांनी सांगितले, विभागात काही ठिकाणी रस्त्यांचे नुकसान झाले आहे.
नांदेडमध्ये काही घटना घडल्या आहेत. विभागाच्या यंत्रणेने जेसीबीच्या साह्याने वाहतूक सुरळीत केली आहे. पुलांचे काहीही नुकसान झाले नाही. बांधकाममंत्री पाटील यांनी २०१७-१८ या वित्तीय वर्षातील रेंगाळलेली कामे सुरू करण्याबाबत आढावा घेतला. आॅक्टोबरअखेरपर्यंत सर्व कामे सुरू होतील. त्या दिशेने प्रयत्न करण्याच्या त्यांनी सूचना केल्या. त्याच वित्तीय वर्षातील ७ कामे कार्यादेशापर्यंत पोहोचली आहेत. काही पुलांची कामे बाकी असून, ती सुरू करण्याबाबत त्यांनी सांगितले. २०१८-१९ या वित्तीय वर्षातील ४१ कामांना तांत्रिक मान्यता देण्याचे नियोजन आहे. येत्या मंगळवारपर्यंत त्या कामांच्या निविदा मंजूर होतील.
एकूण ५१९ कामांची तरतूदविभागात सर्व मिळून ५१९ कामांची तरतूद करण्यात आली आहे. त्या कामांना गती देण्याचे पाटील यांचे आदेश आहेत. आॅक्टोबरअखेरपर्यंत बहुतांश कामे उरकली पाहिजेत. यासाठी मराठवाड्यातील कार्यकारी अभियंत्यांना बैठकीला बोलावले होते. तसेच नांदेड, उस्मानाबाद, औरंगाबाद, लातूर अशा सर्कलमधून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बांधकाम मंत्र्यांनी कामाचा आढावा घेतला. मार्च, जुलै आणि डिसेंबर अशा तीन टप्प्यांत अनुदानाची तरतूद केली जाते. त्यानुसार कामांची डेडलाईन ठरते, असे मुख्य अभियंता पाटील म्हणाले.