बीड : जिल्ह्यात ३८१ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत असून यामध्ये ३०७ गावे तर २०३ वाड्यांचा समावेश आहे. दिवसेंदिवस पाण्याचे दुर्भीक्ष वाढत आहे. जिल्ह्यात आष्टी तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ८६ टँकर सुरू आहेत. आजघडीला जिल्ह्यात पाच लाख ६२ हजार ७०७ नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. गतवर्षी पेक्षा यंदा टंचाईची तीव्रता जास्त असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या गावांमध्ये ३०७ गावे व २०३ वाड्यांचा समावेश आहे. यामध्ये बीड तालुक्यात ७३ गावे तर १९ वाड्या आहेत. या शिवाय ६२६ विहिरी व बोअर यांचे शासनाने अधिग्रहण केले आहे. दिवसेंदिवस पाणी पातळी खालावली जात असल्याने फेब्रुवारी- मार्च दरम्यान अधिग्रहीत केलेल्या काही विहिरींचे जलस्त्रोत आटत आहेत. यामुळे नवीन उद्भव शोधण्याचे आव्हान संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांपुढे उभे ठाकले आहे. मंगळवारपर्यंत २५ च्या जवळपास गावांमधून टँकरची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)पाणीपुरवठ्याची योजना राबविलेल्या गावांमधूनही टँकरची मागणी होत आहे. एप्रिलमध्ये राज्याच्या प्रधानसचिवांनी टंचाईबाबत आढावा बैठक घेतली होती. यावेळी ज्या गावांमध्ये पाणीपुरवठ्याच्या योजना राबविलेल्या आहेत. त्या गावांमधून टँकरची मागणी होतेच कशी? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. सध्या अशीच परिस्थिती बीड जिल्ह्यात निर्माण झाली आहे. बहुतांश गावात यापूर्वी पाणीपुरवठा योजनेवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही पाण्याचे दुर्भीक्ष आहे. यामुळे प्रशासन हतबल झाले आहे. मात्र कार्यकर्ते आमदारांच्या शिफारशी आणून टँकर मंजुरीसाठी दबाव टाकत असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
३०७ गावे तर २०३ वाड्यांवर टँकरने पाणी
By admin | Updated: May 13, 2015 00:28 IST