औरंगाबाद : महाराष्ट्रातील मराठा समाजाला राज्य शासनाने दिलेले आरक्षण न्यायालयाच्या आदेशाने स्थगित झाले आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचा लढा कायदेशीर आणि रस्त्यावर लढण्यासाठी मराठा समाजातील २६ संघटना एकत्र आल्या आहेत. या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक २५ डिसेंबर रोजी देवगिरी महाविद्यालयात पार पडली. याप्रसंगी मराठा आरक्षणासाठी संपूर्ण मराठा समाजच रस्त्यावर उतरविण्याचा निर्धार सर्वानुमते व्यक्त करण्यात आला. २०१६ हे वर्ष मराठा आरक्षणासाठी जनआंदोलनाचे वर्ष म्हणून यावेळी घोषित करण्यात आले. मराठा आरक्षणाचा वाद न्यायालयात प्रलंबित असल्याने हा लढा कायदेशीर पद्धतीनेही लढावा लागणार आहे. त्यामुळे न्यायालयीन लढाईही तेवढ्याच हिमतीने आणि नियोजित पद्धतीने लढली जाणार आहे. या आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यासाठी ९ आणि १० डिसेंबर रोजी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची शहरात बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती शिव प्रहार संघटनेचे संजीव भोर पाटील यांनी कळविली.या बैठकीला शिवक्रांती सेनेचे संजय सावंत, मराठा आरक्षण एकीकरण समितीचे शिवाजी शेलार, विद्यार्थी कृती समितीचे अविनाश खापे, बाळासाहेब सराटे, राजेंद्र दाते, छावा संघटनेचे किशोर चव्हाण, अ.भा. छावाचे सचिन मिसाळ, सुभाष जंगले, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे संतोष गव्हाणे, माधव देवसरकर, बळीराजा संघटनेचे विजय काकडे, क्रांतीसेनेचे नितीन देशमुख, संतोष तांबे, मराठा महासंघाचे सुरेश डिडोरे, ज्ञानेश्वर कणके, मराठा सेवा संघाचे कृषिराज टकले, संभाजी सेनेचे सखाराम काळे, रवी सोडतकर, संभाजी ब्रिगेडचे प्रदीप सोळुंके, बाळासाहेब गरुड, विलास तांगडे, शिवराज्य संघटनेचे प्रशांत इंगळे, एकनाथ घोडके आदींसह सुमारे ५०० कार्यकर्ते उपस्थित होते.
मराठा आरक्षणासाठी २६ संघटना एकत्र
By admin | Updated: December 27, 2015 00:23 IST