औरंगाबाद : आंबेडकरनगरातील एका तरुणाने सिडको एन-८ परिसरातील २० वर्षीय तरुणीला पळवून नेले. आता या मुलीला परत करण्यासाठी तरुणाच्या घरच्यांनी मुलीच्या वडिलांकडे तब्बल २५ लाख रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाही तर मुलीला विकून टाकू, अशी धमकीही दिली. या प्रकरणी अखेर मंगळवारी तरुणासह त्याच्या घरच्यांविरुद्ध खंडणीचा गुन्हा नोंदविण्यात आला.घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, एन-८ परिसरातील ही २० वर्षीय तरुणी एमजीएम महाविद्यालयात बी.एस्सी.चे शिक्षण घेते. ३१ मार्च रोजी ती कॉलेजला गेली. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास मुलीचा भाऊ तिला परत आणण्यासाठी कॉलेजला गेला. मात्र, ती काही सापडली नाही. मग घरच्यांनी शोधाशोध सुरू केली. चौकशी केली. अखेर घरच्यांनी १ एप्रिल रोजी सिडको ठाणे गाठले आणि मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. त्यानंतर चौकशीत मुलीला स्वप्नील किसन गवळे (१८, रा. आंबेडकरनगर) या तरुणाने फूस लावून पळवून नेले असल्याची माहिती घरच्यांना समजली. मग मुलीच्या घरच्यांनी स्वप्नीलचा पत्ता शोधला. अखेर १७ एप्रिल रोजी त्याचा पत्ता मिळाला. मुलीच्या वडिलांनी घरी जाऊन स्वप्नीलचे वडील किसन गवळे व आईची भेट घेतली. तेव्हा त्यांच्याकडून मिळालेले उत्तर ऐकून मुलीच्या वडिलांना धक्काच बसला. मुलगी परत करण्यासाठी चक्क स्वप्नीलच्या घरच्यांनी पैशांची मागणी केली. मुलीसाठी वडील पैसे देण्यास तयार झाले. तेव्हा किती पैसे द्यायचे हे आम्ही दोन दिवसांत सांगतो, असे मुलाच्या घरच्यांनी सांगितले. १९ तारखेला पुन्हा बैठकीला बोलविण्यात आले. ठरल्याप्रमाणे मुलीचे वडील दोन मित्रांसह स्वप्नीलच्या घरी गेले. तेथे त्याचे वडील किसन, आई व मामा होते. मुलीच्या वडिलांनी ‘माझी मुलगी परत करा होऽऽऽ’ अशी विनवणी केली. त्यावर मुलीला परत करण्यासाठी चक्क मुलाच्या घरच्यांनी २५ लाख रुपयांची मागणी केली. त्यावर मुलीच्या वडिलांनी इतके पैसे माझ्याकडे नाहीत, असे म्हणत दहा लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली. मात्र, ते ऐकेनात. पैसे मिळाले नाही तर मुलीला विकून टाकू, ती आमच्या काही कामाची नाही, असे म्हणत मुलाच्या घरच्यांनी त्यांना हुसकावून लावले. अखेर मुलीच्या वडिलांनी तेथून सरळ सिडको पोलीस ठाणे गाठले आणि मुलगा स्वप्नील, त्याचे वडील किसन गवळे, आई व मामाविरुद्ध खंडणीची फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फौजदार ए. के. मोरे हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.आरोपी स्वप्नील गवळे व त्याने फूस लावून पळवून नेलेली मुलगी अद्याप पोलिसांना सापडलेली नाही. ते कोठे आहेत, मुलीला कोठे दडवून ठेवले, याचा पोलिसांनी आता शोध सुरू केला आहे.
तरुणीच्या सुटकेसाठी २५ लाखांची मागणी
By admin | Updated: April 21, 2016 00:33 IST