औरंगाबाद : कोरोनामुळे समृद्धी महामार्गाचे काम प्रभावित झाले आहे. या महामार्गावर काम करणारे २५ टक्के परप्रांतीय मजूर होळीच्या सणासाठी गावी गेले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला घाबरून ते अद्यापही कामावर परतलेले नाहीत. तथापि, या महामार्गावर जिल्ह्यात दोन कंत्राटदार संस्थांमार्फत काम केले जात असून, ‘एल अँड टी’ या कंत्राटदार संस्थेचे ८६ टक्के, तर मेगा इंजिनिअरिंगचे ६६ टक्के काम पूर्ण झाले आहे. या महामार्गावर काम करीत असलेले पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यातील मजूर होळीच्या सणासाठी गावी गेले आहेत. त्यानंतर महाराष्ट्रात कोरोनाची मोठी लाट आली. त्यामुळे गावी गेलेले मजूर कोरोनाला घाबरून अजूनही कामावर परतलेले नाहीत. जिल्ह्यात ११२ किलोमीटर लांबीच्या या महामार्गावर माळीवाड्यापासून पुढे ‘एल अँड टी’ आणि जालन्यापासून अलीकडे माळीवाड्यापर्यंत ‘मेगा इंजिनिअरिंग’ या दोन कंत्राटदार संस्थांमार्फत कामे सुरू आहेत. ‘एल अँड टी’चे ८६ टक्के, तर ‘मेगा’ इंजिनिअरिंगचे आतापर्यंत ६६ टक्के काम पूर्ण झाले आहे. लासूरस्टेशनजवळील रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. तेथे रेल्वेचा मेगा ब्लॉक घ्यावा लागणार आहे. त्यामुळे या कामाला थोडा विलंब होत आहे, तर माळीवाडा जंक्शनचे कामही प्रगतिपथावर आहे. सावंगी येथे ‘मेगा’मार्फत इंटरचेंज जंक्शनचे काम सुरू आहे; परंतु तेथे भूसंपादनाबाबत थोडासा अडथळा आला आहे. १ मे पासून वाहतूक सुरळीत करण्यासाठी ६ पैकी ३ लेनचे काम पूर्ण करण्याचे या संस्थेचे नियोजन होते. बोगद्याचे कामही हीच संस्था करीत असून, ३०० पैकी २०० मीटर लांबीचे एका बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या बोगद्याचे कामही सोबतच सुरू आहे.
चौकट...
महामार्गावर सुविधांना प्राधान्य
या महामार्गावरून वाहतूक सुरू झाल्यानंतर नागपूर ते शिर्डी दरम्यान वाहनधारकांना पेट्रोलपंप, चहा-पाणी, जेवण, वॉशरुमची सुविधा अत्यावश्यक आहे. ती देण्याबाबत ‘एमएसआरडीसी’ने हालचाली सुरू केल्या आहेत. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करून या महामार्गावर काम करणाऱ्या मजुरांचे लसीकरण करून घेतले आहे. दरम्यान, ‘एल अँड टी’ या कंत्राटदार संस्थेचे २५ मजूर कोरोनाबाधित होते. त्यापैकी १७ जण बरे होऊन कामावर परतले आहेत, तर ‘मेगा’चे ३० कामगार बाधित झाले होते. त्यापैकी २० जण बरे झाले आहेत. मजूर बाधित झाल्यामुळे नव्हे, तर कोरोनाला घाबरल्यामुळे कामावर परिणाम होत आहे, असे अधीक्षक अभियंता बी. पी. साळुंके यांनी सांगितले.