लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कापसाच्या गाठीची फोन आणि ई-मेलवर आॅर्डर देऊन त्यांची परस्पर दुसऱ्या कंपनीला विक्री करून व्यापाऱ्याची २१ लाख ९१ हजार ६९ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सिडको ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. मार्च महिन्यात ही फसवणूक झाली.कौशलजी, श्रीअरुलमुर्गन मिल्स आणि आँधीकद्दू कल्लापलायम (रा. इचिपत्ती, पो. सोमनूर, जि. कोइम्बतूर तामिळनाडू), अशी आरोपींची नावे आहेत. तक्र ारदार विनीत सुरेशकुमार तायल (रा. गुरुसहानीनगर, सिडको) यांची सिडकोतील टाऊन सेंटर येथे श्री शंकर कॉटन कॉर्पोरेशन नावाची कंपनी आहे. कापसाच्या गाठी ते विक्री करतात. २३ मार्च रोजी त्यांना एका मोबाइल नंबरवरून कौशल नावाच्या व्यक्तीचा फोन आला. त्याने उसनवारी तत्त्वावर कापसाचे १०० बंडल राघवेंद्र टेक्सटाइल्स मिल या कंपनीस पाठविण्यास सांगितले. त्यासाठी सामानूर येथील व्हनिला टेक्सटाइल्स येथे डिलिव्हरी देण्यास सांगितले. त्याच्यासाठी आरोपीने त्यांना ई- मेल पाठविला. कौशलवर विश्वास ठेवून विनीत यांनी २१ लाख ९१ हजार ६९ रुपयांच्या गाठी नांदेड येथील एका ट्रान्स्पोर्टमार्फत पाठविल्या. आरोपीने तो माल राघवेंद्र टेक्सटाइल्स कंपनी येथे न उतरविता परस्पर अरुलमुर्गन कंपनीस विक्री केला. अरुलमुर्गन या कंपनीने माल मिळाल्याचे तक्र ारदार यांना फोन करून कळविले. मात्र, तेव्हापासून कालपर्यंत तक्रारदार रकमेची आरोपींकडे मागणी करीत होते. सुरुवातीला त्याने आज देतो, उद्या देतो, असे करून वेळ मारून नेली.मात्र, गेल्या काही दिवसांपासून तर आरोपीने त्याचा मोबाइल नंबरच बंद करून टाकला. आरोपीशी संपर्क होत नसल्याने शेवटी त्यांनी सिडको ठाण्यात आरोपींविरुद्ध २१ लाख ९१ हजार ६९ रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार नोंदविली. पो.नि. बारगळ म्हणाले की, या गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे. आरोपींना आम्ही लवकरच अटक करू.
कापसाच्या गाठी विकून २२ लाखांची फसवणूक
By admin | Updated: June 27, 2017 01:04 IST